Published on
:
05 Feb 2025, 4:12 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:12 am
नाशिक : बँकेत तारण ठेवलेल्या सोन्यावर टेकओव्हर लोन मंजूर करून एकाने फायनान्स कंपनीकडून १६ लाख १५ हजार रुपये घेत त्याचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुपीक फिनटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित निखिल अरुण खैरनार (रा. सिरीनमेडोज, गंगापूर रोड) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
कॉलेज रोडवरील रुपीक फायनान्स कंपनीतील अक्षय संजय घागरमळे (३१, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखिल खैरनार याने ९ ते १ नोव्हेंबरदरम्यान गंडा घातला. खैरनार याने फायनान्स कंपनीत येत सी.एस.बी. बँकेकडे ३४०.५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गहान ठेवून त्यावर १५ लाख ९८ हजार ६५८ रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत कर्जपावती दिली होती. या कर्ज पावतीच्या आधारे संशयित निखिलने फायनान्स कंपनीकडे टेकओव्हर लोन मागितले. त्यानुसार फायनान्स कंपनीने पावतीवरील वर्णनाच्या आधारे सोन्याच्या दागिन्यांची किंमत काढून त्यावरून ७५ टक्क्यांनी १६ लाख १५ हजार रुपये कर्ज मंजूर केले. तसेच फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी निखिल याच्या घरी जाऊन खातरजमा केली. त्यानंतर रुपीक फायनान्स कंपनीकडून निखिलच्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. तसेच सी.एस.बी. बँकेकडे आरटीजीएस करण्यासाठी अर्ज दिला. मात्र, केवायसी अपडेटची अडचण असल्याने पैसे जमा झाले नाही. त्यानंतर निखिल सहकुटुंब बेपत्ता झाला. त्यामुळे सायबर पोलिसांना तक्रार करीत फायनान्स कंपनीने संशयिताचे बँक खाते गोठवले. त्यानंतर गंगापूर पोलिसांकडेही तक्रार केली.
पैसे इतर बँक खात्यात वर्ग
दरम्यान, निखिलने त्याच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे इतर बँक खात्यात वर्ग केल्याचे उघड झाले. तसेच अक्षय यांनी सी.एस.बी. बँकेत जाऊन निखिलने दिलेल्या सोने तारण पावतीची चौकशी केली असता निखिलने कोणत्याही प्रकारचे दागिने गहान ठेवलेले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे निखिल याने सोने तारण ठेवल्याची बनावट पावती व स्टेटमेंट दाखवून रुपीक फायनान्स कंपनीच्या पैशांचा अपहार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.