Published on
:
05 Feb 2025, 4:28 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:28 am
नाशिक : आगामी सिंहस्थ नियोजनासाठी प्रशासनातील अधिकारी १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान प्रयागराज येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यात सहभागी होणार आहेत.
यात प्रामुख्याने सिंहस्थातील गर्दीवर अभ्यास केला जाणार आहे. अधिकारी गुरुवारी (दि. ६) त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा करणार असल्याचीही माहिती प्रशासनाने दिली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये कुंभमेळा भरणार आहे. यातच प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वरला गर्दीच्या नियोजनाचे मोठे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 4) विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. गेल्याच आठवड्यात पालक सचिव एकनाथ डवले, गृहविभागाचे सचिव चहल यांनी बैठक घेत भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने आढावा बैठकीत सूक्ष्म नियोजनावर चर्चा झाली. बैठकीत प्रयागराज येथे महाकुंभासाठी उभारलेल्या सुविधांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने माहिती घेण्यात आली. जी कामे पूर्ण होण्यास किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे ती प्राधान्याने सुरू करण्याचे आदेश गृह सचिवांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कोणत्या विभागांनी कोणती कामे आताच सुरू करायची याचे नियोजन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना
सिंहस्थात गर्दीचे नियोजन सर्वात मोठे आव्हान असणार आहे. बॅरिकेडिंग, सुरक्षाव्यवस्था आणि सीसीटीव्ही बसविण्याबाबत गृहसचिवांकडून सविस्तर सूचना प्राप्त झाल्या असून, त्याबाबतच्या तयारीची माहिती बैठकीत घेण्यात आली. त्या अनुषगांने नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले आहेत.