Published on
:
17 Nov 2024, 6:12 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:12 am
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असलेली १६ हेक्टर अर्थात ४० एकर जागा अखेर महसूल विभागाकडून एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे. गेल्या जुलै महिन्यात अंबड एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने ही जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय घेतला होता. एमआयडीसीच्या प्लॅनिंग विभागाकडून या ठिकाणी ले-आउटची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, त्यानंतर ही जागा उद्योगांसाठी उपलब्ध होणार आहे.
नाशिक एमआयडीसीच्या अंबड आणि सातपूर या दोन अँकर इंडस्ट्री असून, या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने बाहेरून येणारे बरेच उद्योग परतत आहेत. याशिवाय स्थानिक उद्योगांच्या विस्तारीकरणालाही खीळ बसली आहे. दरम्यान, उद्योगांसाठी जागा मिळावी यासाठी निमा-आयमा या औद्योगिक संघटनांकडून सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. त्याला प्रतिसाद म्हणून सरकारने अंबड एमआयडीसीला लागून असलेली १०० एकरपैकी सपाट ४० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेमुळे विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याने, या ठिकाणी उद्योग विस्तारासह सुमारे एक हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.
२४ काेटी २ लाख ४० हजार इतके या जमिनीचे मूल्य असून, राज्य शासनाच्या महसूल विभागाने विनामूल्य ही जागा एमआयडीसीला हस्तांतरित केली आहे. या जागेवर सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक येण्याची क्षमता असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहेत.
एमआयडीसीकडून या जागेचे रेखांकन व पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन केले जात असून, ही प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्योजकांना येथील भूखंड वितरित केले जाणार आहेत. सध्या आचारसंहिता असल्याने याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागू शकताे, असे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नव्या उद्योगांनाही मिळावे भूखंड
गेल्या काही काळापासून नाशिक एमआयडीसीमध्ये भूखंड माफियांचा मोठ्या प्रमाणात वावर बघावयास मिळत आहे. सातपूर, अंबडमधील मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे तुकडे करून, अवाच्या सव्वा किमतीत त्याची विक्री केली आहेत. त्यामुळे या जागेवरही भूखंड माफियांचा डोळा आहे. मात्र, हे भूखंड विस्तारीकरणाबरोबरच नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांनाच प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत, असे मत उद्योजकांकडून व्यक्त केले जात आहे.