पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याचा वार करून आणि कूकरचे झाकण मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Pudhari News Network
Published on
:
05 Feb 2025, 3:39 am
Updated on
:
05 Feb 2025, 3:39 am
नाशिक : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याचा वार करून आणि कूकरचे झाकण मारून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी घडली. गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील स्वस्तिक निवास सोसायटीत दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. सविता छत्रगुण गोरे (४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
गंगापूर रोडवरील डी. के. नगरमध्ये गाेरे कुटुंबीय भाडेतत्त्वाने राहते. मंगळवारी गोरे यांचा मुलगा नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर सविता - छत्रगुण हे पती-पत्नी घरात होते. घर स्थलांतरित करण्याचे नियोजन असल्याने दाम्पत्याकडून संसारोपयोगी साहित्याची आवरासावर सुरू होती. त्यातच दोघांमध्ये दुपारच्या सुमारास कौटुंबिक कारणातून वाद झाले होते. यावेळी संशयित छत्रगुण मुरलीधर गोरे (५०) याने पत्नी सविता गोरे यांच्या डोक्यात कोयता व कूकरचे झाकण मारले. यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर पडल्या होत्या. त्यांची मुलगी मुक्ता बालाजी लिखे या घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुक्ता यांनी बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर वडील छत्रगुण यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये आढळली. मात्र तोपर्यंत संशयित छत्रगुण तेथून पसार झाला. मुक्ताने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली. रहिवाशांनी गंगापूर पोलिसांना माहिती कळवली. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जुमडे, पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुक्ता लिखे यांच्या फिर्यादीनुसार छत्रगुणविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित मारेकरी छत्रगुण हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी गंगापूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकासह इतर दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितास दारूचे व्यसन असून, पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत असल्याची माहिती समजली आहे. या कलहातून संशयिताने खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे.
- सुशील जुमडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गंगापूर पोलिस ठाणे