देवळाली (126) विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवित असलेल्या सरोज आहिरे यांनी तब्बल 40 हजार 859 मतांची आघाडी घेत विधानसभा निवडणुकीत दुसर्यांदा बाजी मारली.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 9:02 am
Updated on
:
24 Nov 2024, 9:02 am
नाशिक : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देवळाली (126) विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवित असलेल्या सरोज आहिरे यांनी तब्बल 40 हजार 859 मतांची आघाडी घेत विधानसभा निवडणुकीत दुसर्यांदा बाजी मारली.
सरोज आहिरेंची पहिल्या फेरीत 5,663 मतांची आघाडी
20व्या फेरीत 40 हजारांची निर्णायक आघाडी
राजश्री अहिरराव दुसर्यास्थानी
मिळालेली मते
सरोज अहिरे - 81,683
डॉ. राजश्री अहिरराव - 41,004
योगेश घोलप - 39,027
अविनाश शिंदे - 11,831
सरोज आहिरे यांना 81 हजार 683 मते पडली. शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या डॉ. राजश्री अहिरराव यांना 41 हजार चार मते, तर शिवसेना ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना 39 हजार 27 मते पडली. मनसेच्या मोहिनी जाधव यांना तीन हजार 931 मते मिळाली. देवळालीत एकूण मतदारांची संख्या दोन लाख 81 हजार 141 इतकी आहे. यापैकी एक लाख 83 हजार 754 मतदारांनी म्हणजेच 59.51 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1,089 पोस्टल मतांचा समावेश आहे.
पहिल्या फेरीपासूनच सरोज आहिरेंनी 5,663 मतांनी आघाडी घेतली होती. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश शिंदे यांना 11 हजार 831 पडली तर 1,406 मतदारांनी नोटाचा हक्क बजावला. तर टपालाची 127 मते रद्दबातल ठरली.
मतमोजणीदरम्यान पहिल्या फेरीपासूनच सरोज आहिरे या आघाडीवर होत्या. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या डॉ. राजश्री अहिरराव दुसर्या स्थानी होत्या. तर योगेश घोलप तिसर्या स्थानी होती. 18 व्या फेरीअखेर योगेश घोलप यांनी 458 मतांची आघाडी घेत डॉ. अहिरराव यांना मागे टाकले होते. मात्र, 19 व्या फेरीला पुन्हा अहिरराव दुसर्या स्थानी आल्या.
पराभव मान्य करतानाच योगेश घोलप यांनी समाजमाध्यमांवर राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. याबाबत त्यांचे वडील बबनराव घोलप यांना विचारले असता योगेश घोलप यांनी निवृत्तीविषयीची पोस्ट टाकल्याचे सांगितले. मात्र, काही वेळातच ही पोस्ट डिलिट करण्यात आली. योगेश घोलप यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.
डॉ. राजश्री अहिरराव निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे याचा सरळ फटका यांना बसला. डॉ. अहिरराव यांना 41 हजार चार मते, तर योगेश घोलप यांना 39 हजार 27 मते मिळाली. दोघांच्या मतांची बेरीज केली असता ती 80 हजार 31 इतकी होते. याचा अर्थ डॉ. राजश्री अहिरराव यांनी निवडणूक लढविल्याचा फटका सरळसरळ योगेश घोलप यांना बसला.
कामामुळेच जनतेने मला निवडून दिले. सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान केले. मतदारसंघात विकासाची गंगा आणणार असल्याचा दिलेला शब्दा खरा करेन.
सरोज आहिरे, राष्ट्रवादी अजित पवार गट
पंचवार्षिकमध्ये विकास झालेला नाही. पुढील पंचवार्षिकमध्ये विकास होईल की नाही याची शंका आहे. विकासासाठी आमचा लढा असाच सुरूच राहणार
योगेश घोलप, शिवसेना ठाकरे गट