Published on
:
25 Nov 2024, 4:34 am
Updated on
:
25 Nov 2024, 4:34 am
नाशिक : निकालाच्या पूर्वसंध्येपासून ते निकालानंतर अभिनव आणि समकालिक परिस्थितीवर बोट ठेवणार्या मीम्स, फोटोज, व्हिडिओज आणि संदेशांमधून व्यक्त होत ‘नेटिजन्स’नी समाज माध्यमांवर धमाल केली. विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता असलेला व्हिडिओदेखील कमालीचा व्हायरल झाला.
ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्यावर नेटिजन्सनी सर्वाधिक मीम्स, कार्टून्स, संदेश ‘व्हायरल’ केलेले दिसले. एका छायाचित्रात संजय राऊतांना पेटी वाजवता दाखवत, ‘मंथरा और शकुनी की तरह याद किया जायेगे आज के संजय’ असे संदेश लिहून, राऊतांनी शिवसेना संपवली, असे दाखवण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेरा दाखवून, ‘आता लग्न, मुंज, हळदी, बारशाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील’, असा उपहास करण्यात आला.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले कार्टुन Pudhari News network
एका व्यंगचित्रात लाडक्या बहिणींच्या हातात झाडू दाखवून त्या पंजा, तुतारी अन् मशालींचे भग्न अवशेष साफ करताना दाखवण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या हातात ‘पवारांचा नाद, जिंदगी बरबाद’ अशा आशयाचा फलक दाखवत टीका करण्यात आली. एका व्हिडिओत, ‘खत्म, टाटा बाय - बाय गया’ असा संदेश लिहून पराभूत राजकीय नेतृत्वावर उपाहासात्मक मीम्स ‘व्हायरल’ झालेत. सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंचे सात्वन करताना, ‘...आता तुझे आणि माझेही पप्पा घरी’ असा चिमटा घेण्यात आला.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले कार्टुन Pudhari News network
मनोज जरांगे पाटीलही उपहासाचे धनी ठरले. ‘साहेबांची तुतारी फुंकून माझ्या बरगड्या मोडल्या, आता तुम्ही तुमचे बघा’ असे संदेश जरांगेंच्या झोपलेल्या फोटोसह प्रसारित झालेत.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले कार्टुन Pudhari News network
‘ईव्हीएम’ला दोष नको, संघाला श्रेय...
अनपेक्षित निकाल लागल्यानंतर महायुती समर्थकांनी महाविकास आघाडीच्या समर्थकांना ‘ईव्हीएम’चे चित्र पाठवत, ‘आता याला दोष देऊ नका’ असे सांगत चिडवण्याचा प्रयत्न केला. ‘ना दिखावा, ना श्रेय घेण्याची इच्छा, ते आले शांतपणे आपले काम करून गेले, त्यांचे काम एकच; भारतमातेला परम वैभवावर नेणे’ असे लिहून भाजप समर्थकांनी विजयाचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देत, ‘पडद्यामागचे शिल्पकार’ असे संबोधले.