Navratri 2024 : तयारी पूर्ण; उद्यापासून आदिमायेचा जागर

2 hours ago 1

नाशिक : विक्रेत्यांकडून नवरात्री उत्सवानिमित्ताने जोरदार तयारी केली जात आहे. (छाया : हेमंत घोरपडे)

पुढारी वृत्तसेवा

Published on

02 Oct 2024, 6:19 am

Updated on

02 Oct 2024, 6:19 am

नाशिक : उद्या गुरुवार (दि. ३) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून, आदिमायेची मनोभावे उपासना करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. सजावटीसह घटस्थापनेचे साहित्य खरेदी-विक्रीच्या निमित्ताने बाजारपेठेला झळाळी आली आहे. बाजारात भाविकांची मोठी गर्दी बघावयास मिळत असून, उलाढाल वाढल्याने विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Sharadiya Navratri festival is starting from Thursday, 3rd October 2024)

श्राद्ध पक्षाच्या समाप्तीसह गुरुवार (दि. ३)पासून दुर्गादेवीच्या नऊ दिवसांच्या उपासनेला प्रारंभ होत आहे. सार्वजनिक मंडळांनी देवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण केली असून, नऊ दिवसांदरम्यानच्या विविध उपक्रमांची यादीदेखील तयार केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रासदांडियाचे विशेष आकर्षण असते. विशेषत: तरुणाईकडून यासाठी विशेष तयारी केली जात आहे. ग्रामीण भागातही उत्साह आहे. कुलदैवत, ग्रामदेवतेसमोर घटस्थापना करून नऊ दिवस देवीची मनोभावे उपासना केली जात असल्याने, महिलावर्गाची लगबग वाढली आहे.

दुर्गा सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे सर्वात शुभ दिवस मानले जात असल्याने, या दिवसांचे आतापासूनच नियोजन केले जात आहे. दरम्यान रंग, उत्साह आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Navratri 2024

नाशिकचे ग्रामदैवत येथे नवरात्रोत्सवानिमित्त कालिकादेवी मंदिरात साफसफाई केली जात असून, मंदिर परिसरात नऊ दिवस यात्रोत्सव असल्याने तयारी पूर्ण झाली आहे. (छाया : हेमंत घोरपडे)

अष्टमी, महानवमीचे उपवास एकाच दिवशी

यावर्षी अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली आहे. ७ ऑक्‍टोबरला ललिता पंचमी आणि ९ ऑक्‍टोबरला सरस्वती आवाहन आहे. १० तारखेला महालक्ष्मी तसेच त्याचदिवशी सरस्वती पूजन होईल. यावर्षी अष्टमी आणि महानवमीचे उपवास एकाच दिवशी ११ ऑक्‍टोबरला, तर १२ ऑक्‍टोबरला विजयादशमी आहे.

ड्रायफ्रूट मूर्तीचे आकर्षण

सार्वजनिक मंडळांकडून यंदा सप्तश्रृंगी माता, रेणुकादेवी, कालिकामाता, सरस्वती, तुळजाभवानी, महालक्ष्मी आदी रूपे असलेल्या आदिमायेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तशा मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. तसेच काजू, बदाम आणि ड्रायफ्रूट वापरून बनविलेल्या मूर्तीही विशेष आकर्षण ठरत आहेत. मंडळांकडून दोन फुटांपासून ते दहा फुटांपर्यंतच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

घटस्थापना साहित्याला मागणी

पूजा साहित्यापासून टिपऱ्यांपर्यंत नानाविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. घटस्थापनेसाठी लागणारी कामट्यांची टोपली, माती, मातीचे घाट, सात प्रकारचे धान्य, मखमली आणि झेंडूची फुले, घट बांधण्यासाठी दोरा, करंडा, फणी, ओढणी, कापसाचे वस्त्र आदी साहित्य पाच रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. परतीच्या पावसाचा झेंडू उत्पादनाला फटका बसल्याने, यंदा भावात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत झेंडूच्या फुलांना मागणी असणार आहे. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते, तर नवरात्रोत्सवात पूजेसाठी झेंडूचा मोठा वापर केला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article