Published on
:
31 Jan 2025, 4:01 am
Updated on
:
31 Jan 2025, 4:01 am
नाशिक : महापालिकेच्या आनंदवली शाळेतील इयत्ता आठवीचे 30 विद्यार्थी हे बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोला भेट देण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी रोजी रवाना होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या संशोधक वृत्ती निर्माण व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम लोकसहभागातून राबविला जात आहे.
खासगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महापालिकेचे विद्यार्थीदेखील शिक्षणाच्या गुणवत्तेत कमी पडू नये, यादृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या शाळा या स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतरित झाल्या असून, या प्रकल्पामुळे मनपा शाळेतील पटसंख्या वाढीस मदत झाली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड जोपासली जावी आणि त्यांच्यात त्याविषयी जागृती निर्माण होऊन संशोधक वृत्ती निर्माण व्हावी याकरता महापालिकेने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यास दौऱ्याअंतर्गत थेट इस्त्रो येथे भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या आनंदवली येथील शाळेतील इयत्ता आठवीच्या 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी ओझर विमानतळावरून 20 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे रवाना होतील. यासाठी लागणारा खर्च शिक्षक, दानशूर व्यक्ती तसेच पालक यांच्या माध्यमातून भागविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली.
अशी झाली विद्यार्थ्यांची निवड
शालेयस्तरावर आनंदवली शाळेत विज्ञान विषयावर आधारित परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करूनदेखील काही विद्यार्थ्यांची निवड केली.
लोकसहभागातून हा अभ्यास दौरा होत आहे. मनपाच्या माध्यमातूनच अधिकाधिक विद्यार्थ्यांना या प्रकारच्या उपक्रमात सहभागी करता यावे, याकरिता येत्या अंदाजपत्रकात सुमारे एक ते दीड कोटींची तरतूद केली जाणार आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाचे उपक्रम राबविले जात आहेत.
बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा, नाशिक.