हिंगोली (Panlot Rath Yatra) : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 योजनेची स्थानिक समुदायामध्ये पाणलोट विकासाबाबत जागरुकता निर्माण करुन पाणलोट प्रकल्पाविषयी लोकांना माहिती देण्यासाठी तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंगलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत जानेवारी, 2025 मध्ये( Panlot Rath Yatra) पाणलोट रथ यात्रा सुरु करण्यात येणार आहे.
ही रथ यात्रा (Panlot Rath Yatra) हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील बोथी, कुंभारवाडी, डोंगरगाव पूल आणि कामठा, सेनगाव तालुक्यातील बोरखेडी व डोंगरगाव या सहा गावातून जाणार आहे. या रथ यात्रेद्वारे मृद व जलसंधारणाचे महत्व व योजनेच्या जनजागृतीसाठी, प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांमध्ये पाणलोट विकास ही संज्ञा सुपरिचित होऊन पाणलोट प्रकल्पाबाबत जनसामान्यामध्ये जबाबदारीची भावना वाढीस लागण्यासाठी मोबाईल थिएटरद्वारे पाणलोट कामांबाबत आभासी सहलीचा अनुभव देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील निवड केलेल्या सहा गावात पाणलोट चळवळ निर्माण करणे, हातात माती घेऊन मृद व जलसंधारणाची शपथ घेणे, योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील नवीन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पाणलोट क्षेत्रात फळबाग लागवड करणे, पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेल्या मृद व जलसंधारण कामाचे लोकार्पण करणे, पूर्ण झालेली कामे दत्तक घेण्यास स्थानिक शाळांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रम यात्रेच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. दरम्यान पाणलोट यात्रा सुरु होण्यापूर्वी यात्रेसंबंधी जनजागृती करणे, समाज माध्यम व प्रसार माध्यमातू प्रचार प्रसिध्दी करणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व नागरिकांची पाणलोट योध्दा म्हणून निवड करणे, प्रभातफेरी काढणे, गाव व परिसरातील शाळांमध्ये चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
या (Panlot Rath Yatra) यात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार असून कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी सर्व विभागाची बैठक घेऊन पाणलोट यात्रेमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, युवक, स्वयंसेवी संस्था व शेतकरी यांना यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जलसंधारण व कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.