Published on
:
20 Jan 2025, 5:00 pm
Updated on
:
20 Jan 2025, 5:00 pm
भंडारा: तुमसर शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे व शहरातून होत असलेल्या जड वाहतुकीमुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहेत. नुकतेच बसस्थानकासमोर कौशल्या दहाट या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेच्या दोन दिवसानंतर स्मार्ट बाजार समोर भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा हात निकामी झाला. या प्रकाराला वेळीच आळा बसावा यासाठी सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा नगर परिषदेवर काढण्यात आला.
यावेळी नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. तहसीलदार मोहन टिकले, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड व नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाले यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली असता त्यांना आंदोलनकर्त्याकडून अपघातासंदर्भात जाब विचारला गेला. यात शहरातील योग्य उपाययोजना करण्याचे मागणी करण्यात आली. शहरात जड वाहनांची वाहतूक, यांची गती मयार्दा कमी करण्यात यावे, शहरातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेट करण्यात यावे, अवैध रेती वाहतूक व अदानी राखेचा वाहतूक करण्याचा निर्धारित वेळ निश्चित करावे. नगरपालिका मुख्याधिकारी यांनी गावातील रस्ते अतिक्रमणे मोकळे करावे. शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून जाताना वाहतूक पोलिसांनी उपस्थित राहावे. प्रवासी वाहतूक वाहने व बसस्टॉप समोरील वाहनांच्याही गती मर्यादा निश्चित करण्यात यावी. १०, १२ आणि २० चक्के अवजड वाहने शहरात प्रवेश निषेध करावे. बायपास रस्ता मेहगाव रोड ते खापा रोड रस्ता तात्काळ बनविण्यात यावा. खापा- रामटेक रोड वरील हसारा मार्गे कटंगी रोडला वाहतूक सुरू करावे तसेच शहरातील मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे, या सर्व मागण्या ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने वरील सर्व मागण्या मान्य केले असून यावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना निर्देश दिले आहे. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यादरम्यान आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, अमर रगडे, अमित मेश्राम, सुरज भुरे, मिना गाढवे, वंदना आकरे, करुणा घुर्वे, नेहा मोटघरे, विजया चोपकर, माजी नगरसेवक बाळा ठाकूर, मेहताबसिंग ठाकूर, यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.