Published on
:
20 Jan 2025, 7:34 pm
Updated on
:
20 Jan 2025, 7:34 pm
नागपूर : दारू पिऊन मारहाण करीत असल्याने संतप्त अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने वडिलाची गळा आवळून हत्या केली. ही घटना सोमवारी (दि.९) हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंगोले नगरात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलासह त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे. मुकेश शंकरराव शेंडे (५७, रा. इंगोले नगर, प्लॉट नं. १६७, हुडकेश्वर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हा एका हार्डवेअरच्या दुकानात विक्री प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. त्याला पत्नी निर्मला व दोन मुले आहेत. १९ वर्षाचा मोठा मुलगा हा पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो. तर लहान मुलगा दहावीत शिकतो. तर पत्नी निर्मला ही मिळेल ते काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होती. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मोठ्या मुलाला शिक्षण सोडून पुण्यात कामासाठी जावे लागले. होते. मुकेशला दारुचे व्यसन होते. पैसे पुरत नसल्यामुळे तो घरातील वस्तू विकून दारु पीत होता. नेहमीप्रमाणे वादात मुकेशने आईला लाथाबुक्कांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून लहान मुलाचा राग अनावर झाला. त्याने वडिलाला जमिनीवर पाडून घरातील टॉवेल त्याचा गळा आवळला. मुकेशच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आई व मुलाला ताब्यात घेतले आहे.
मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकण्याची तयारी
मुलाने वडिलाची हत्या केल्याचे आई घाबरून गेली. मात्र परंतु रागाच्या भरात पोटच्या पोराने हे कृत्य केल्यामुळे आईने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. मृतदेह नदीत फेकण्याचे नियोजनही केले. ज्याठिकाणी हत्या करण्यात आली तेथील रक्ताचे डाग फिनाईलने पुसून टाकले. पण मृतदेह उचलून कसा नेणार? हा प्रश्न पडल्याने लहान मुलाने त्याच्या एका विश्वासातील मित्राची मदत घेण्याचे ठरविले. त्याने त्याला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितली. मात्र, मित्राने त्याची भेट घेतली आणि समजूत घातली. पोलिसांत जावून सर्व घटना सांगण्यास सांगितले. अखेर दोघेही हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांची भेट घेऊन सविस्तर घटना सांगितली. त्यांनी घटनास्थळ गाठून मायलेकांना ताब्यात घेतले.