Published on
:
21 Jan 2025, 12:52 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:52 am
नोकरी करावी की व्यवसाय? घरच्या व्यवसायात मदत करावी की स्वत:ला आजमावण्यासाठी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा?... काहीच कळत नसतं. तरीही प्रश्न तर सोडवायचा असतोच, पण त्याचा ताण घेऊन काही होणार नाही. तुम्ही जसा विचार करता, अगदी तसाच विचार सर्वजण करतात आणि त्यातून मार्गही काढतात.
दहावीनंतर काय, बारावीनंतर काय... हे प्रश्न आपल्याभोवती आपल्याला कळायला लागलेल्या वयापासून सतत फेर धरून नाचत असतात. आधी आई-वडिलांकडून, मग शेजारच्यांकडून, मग शिक्षकांकडून आणि नंतर स्वत:लाच अस्वस्थ करून सोडतात, पण हे प्रश्न सोडवत, त्यांतून मार्ग काढत आपण पुढे चालत राहतो. कॉलेजच्या टप्प्यावर येतो, तिथलं लाईफही अनुभवतो. पण जसंजसं शेवटचं वर्ष सुरू होतं, तसंतसं आपल्याला आतून गलबलायला लागतं. कॉलेज संपल्यानंतर काय, हा प्रश्न अस्वस्थ करून सोडतो.
आपण काय शिकतो आहोत, आपलं ध्येय काय आहे, या गोष्टींचा आधी विचार करा. तुम्ही व्यावसायिक उच्च शिक्षण घेत असाल, तर आता त्या व्यवसायाला मार्केटमध्ये काय किंमत आहे, त्यात आपण नवीन काय देणार आहोत, त्यासाठी कोणती आव्हाने असतील, याचा आधी विचार करा. कारण कॉलेज लाईफ एन्जॉय केल्यानंतर आता काही दिवसांतच आपल्याला करिअर करायचं आहे, ही मानसिकता तयार व्हायला थोडा वेळ लागतो. ती तयार करा, एकदा मनाचा आराखडा पक्का झाला की मग बघा सारं काही कसं आपोआप सुरळीत होतं ते.
हो, पण भविष्याचा विचार करता करता तुम्ही तुमचा वर्तमानकाळ बिघडवू नका. अनेकजण कॉलेजनंतर काय करायचं, या विचाराने घामाघूम होतात. अनेकांची झोप उडते. त्या वर्षाच्या अभ्यासाकडेही लक्ष लागत नाही. भयंकर ताण येतो आणि त्यातूनच काही जण टोकाचं पाऊलही उचलतात, निराशेच्या गर्तेत सापडतात, पण भविष्यकाळाचा विचार करायचा असला, तरी वर्तमानकाळ खराब होणार नाही ना, याची काळजी घ्यायला शिका. शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. शेवटचं वर्ष अभ्यासात एन्जॉय करा, कारण कॉलेज संपवणारे आणि भविष्याचा विचार करणारे तुम्ही एकटे नाही आहात.
अनेक यशस्वी माणसं त्यांच्या वर्तमानकाळालाच अधिक महत्त्व देतात, हे लक्षात घ्या. एका सर्वेक्षणात असं आढळलंय की, शिक्षण पूर्ण केलेल्या 20 पैकी 19 जणांना हमखास नोकरी मिळतेच आणि या सर्वेक्षणात ज्याला नोकरी मिळाली नाही, त्याला त्याच्या काही चुकाच कारणीभूत होत्या. आळस, कंटाळा, योग्य तयारी न करणं... आता या गोष्टी तुमच्यात असतील, तर जगात कुठेच तुम्हाला नोकरी मिळू शकणार नाही. पण या नसतील, तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल, तर कोणीही तुमची नोकरी हिरावू शकणार नाही.
मोठ्या मित्रांशी, आई-वडिलांशी बोला
ज्या मित्रांनी गेल्या वर्षी किंवा त्या आधी कॉलेज सोडून नव्या करिअरला सुरुवात केली असेल, त्यांच्याशी बोला. त्यांनी काय विचार केला होता, त्यानंतर काय अडचणी आल्या, त्यांनी त्या कशा सोडवल्या आणि आता काय करत आहेत, या सार्या गोष्टी त्यांच्याकडून नीट समजावून घ्या. पण त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही तसंच केलं पाहिजे, असं नाही. तुमची स्वत:ची अशी काही ठाम मतं बनवा, त्यातून तुमच्या करिअरच्या कल्पना तयार करा. त्या आई-वडिलांना सांगा, त्यांच्याशी मनमोकळं बोला. व्यवसाय करणार असाल, तर त्यांची काय मदत होऊ शकते, ते विचारा. कारण करिअरबाबत तुमच्यापेक्षा अधिक विचार त्यांनी अगोदर केलेला असतो.
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर इतरांशी स्वत:ची कधीच तुलना करू नका, असं ख्यातनाम तत्त्ववेत्ते अॅरिस्टॉटल यांनी म्हटलंय. बस, एवढं लक्षात ठेवलं, तरी तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.