‘एआय’ अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.
Published on
:
21 Jan 2025, 12:40 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:40 am
मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात स्पर्धात्मक क्षेत्राची निकड ओळखून अभियांत्रिकीमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या ‘एआय’संबंधित शाखांत कल अधिक आहे. पुणे आणि मुंबई विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असलेल्या 6 हजार 449 जागांपैकी 6 हजार 20 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर मुंबई विद्यापीठातील 2 हजार 594 पैकी 2 हजार 378 प्रवेश झाले आहेत.
बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरला खर्या अर्थाने दिशा मिळत असते. वैद्यकीय शाखेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याने विज्ञान शाखेचे बहुतांश विद्यार्थी आता अभियांत्रिकीकडे वळताना दिसत आहेत. सीईटी सेलकडून अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात झालेल्या प्रवेशाच्या आकडेवारीवर नजर टाकली असताना यावर्षी कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आदी प्रमुख शाखांना प्रथम पसंती विद्यार्थ्यांनी दिली.
अर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डेटा सायन्स या अभ्यासक्रमांचे सर्वांत आकर्षक आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचे दिसत आहे. मशीन लर्निंग विविध कौशल्यांच्या विकासावर भर देणारा असल्याने या अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा कल पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत ‘एआय’चा वापर विविध खासगी आस्थापनांमध्ये वापर दिसून येत आहे. यामुळे अर्थातच राज्यातील महाविद्यालयात जागांची वाढ झाली. पुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात साहजिकच जागा अधिक असल्याने तिथे प्रवेशही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. यंदा मुंबई विद्यापीठात यावर्षी 2 हजार 594 इतक्या जागा होत्या त्यापैकी 2 हजार 378 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांनाही यावर्षी विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. 2 हजार 741 जागापैकी 2 हजार 62 इतक्या जागा भरलेल्या आहेत. एसएनडीटी महिला विद्यापीठातही अर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या असलेल्या 71 जागापैकी 65 जागावर मुलींनी प्रवेश घेतले आहेत.