गडहिंग्लजमध्ये खासगी डॉक्टरसह रुग्णालय प्रशासकावर गुन्हा दाखल करण्यात आला.Pudhari File Photo
Published on
:
21 Jan 2025, 12:53 am
गडहिंग्लज ः शासकीय आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया होत असताना, तक्रारदाराकडे 20 हजारांची मागणी करून त्यापैकी 18 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील खासगी रुग्णालयाचा प्रशासक इंद्रजित शिवाजीराव पाटोळे (वय 48, रा. गडहिंग्लज) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले; तर स्वराज्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित वसंतराव पाटोळे (49, रा. गडहिंग्लज) यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचा मित्र 10 जानेवारी रोजी चक्कर येऊन पडला. त्याच्या डाव्या खुब्याला मार लागल्याने सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी स्वराज्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटोळे यांनी रुग्णावर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्याचे ठरण्यासाठी 20 हजारांची मागणी केली. पैसे दिल्यावरच शस्त्रक्रिया होईल, असे सांगितल्यानंतर तक्रारदारांनी 15 जानेवारी रोजी दहा हजार रुपये डॉ. पाटोळे यांना दिल्यावर 16 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली; तर तडजोडीअंती उर्वरित आठ हजारांची रक्कम प्रशासक पाटोळे याच्याकडे देण्यास सांगण्यात आली.
दरम्यान, तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. आठ हजारांची रक्कम स्वीकारताना प्रशासक पाटोळेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, स. पो. उपनिरीक्षक सुनील मोरे, पो. हवालदार सुनील घोसाळकर, संदीप काशिद, सचिन पाटील, संदीप पवार यांच्या पथकाने केली.
लिव्हरच्या उपचारासाठी हा खर्च
या रुग्णाकडून शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतले नसून, त्यांच्या लिव्हरला सूज असल्याने त्याच्या उपचारांसाठी हे पैसे घेतले आहेत. त्याबाबत त्यांच्याकडून लेखी घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले आहे.