Published on
:
21 Jan 2025, 12:46 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:46 am
नोकरी मिळवण्यासाठी स्वत:ची उत्तम ओळख निर्माण करणे गरजेचे ठरते. त्यासाठी स्किल डेव्हलप करायला हवे. त्या द़ृष्टीने शिक्षण घेतानाच पार्ट टाईम नोकरीचा पर्याय महत्त्वाचा ठरतो.
औद्योगिकीकरणाला मिळत असलेली चालना, जागतिकीकरण, नवनव्या क्षेत्रांचा होत असलेला उदय यामुळे रोजगार निर्मितीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कारकिर्दीच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत. त्यामुळे निवडीला वाव मिळत आहे. असे असले तरी आपल्या आवडीच्या, आवाक्यातील असणार्या क्षेत्रात कारकीर्द करण्यालाच सर्वाधिक पसंती दिली जाते. अर्थात, काही शिक्षण संस्था विविध उद्योगांशी टाय-अप असतात. अशा संस्था ठराविक अभ्यासक्रम गुणवत्तेसह उत्तीर्ण होणार्यांना त्या त्या उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात. असे असले तरी स्वत:साठी चांगली नोकरी शोधण्याची अंतिम जबाबदारी ज्याला-त्यालाच पार पाडावी लागते. त्याद़ृष्टीने स्वत: प्रयत्न करायला हवेत.
गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक वा व्यावसायिक शिक्षण देणार्या संस्थांची संख्या बरीच वाढली आहे; परंतु ती बर्याच प्रमाणात शिक्षणाची दुकाने ठरली आहेत. प्रशिक्षणात प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश नसणे तसेच उद्योगांशी योग्य ताळमेळ नसणे यामुळे अभ्यासक्रमात उत्तम यश मिळूनही मनासारखी नोकरी लागत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बर्याचशा शिक्षण संस्थांचे केवळ कमाईवर लक्ष असते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना चांगली नोकरीही मिळायला हवी याकडे अशा संस्था लक्ष देत नाहीत.
नोकरी मिळवायची तर कोणती का होईना पदवी असावी, असे म्हटले जाते. आजही अनेक पालकांचा हाच आग्रह असतो, तसा समज असणार्या तरुण-तरुणींची संख्याही कमी नाही, परंतु ही पदवी घेण्यासाठी काही वर्षे जातात आणि पदवी मिळाल्यानंतर तिला नोकरीच्या बाजारात तेवढे महत्त्व असेलच, असे सांगता येत नाही. दुसरीकडे अनेक उद्योगांना आवश्यक त्या प्रमाणात कुशल कामगार, तंत्रज्ञ मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत नोकरी मिळवण्यासाठी स्वत:ची उत्तम ओळख निर्माण करणे गरजेचे ठरते. त्यासाठी स्किल डेव्हलप करायला हवे. त्या द़ृष्टीने शिक्षण घेतानाच पार्ट टाईम नोकरीचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित उद्योगांमध्ये जाऊन प्रमुखांना भेटता येईल. ‘आपण अमूक एक अभ्यासक्रम शिकत असून त्यासंदर्भात प्रत्यक्ष अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या कंपनीत अमूक एका पदावर पार्ट टाईम काम करण्याची इच्छा आहे. त्या बदल्यात कंपनीकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही’ असे सांगितल्यास तुम्हाला ही संधी मिळू शकते. तिथे नकार वाट्याला आल्यास निराश न होता किंवा आत्मविश्वास कमी न होऊ देता अन्यत्र प्रयत्न करत राहावेत. कोठे तरी नक्की होकार मिळतो. कदाचित पुढे त्याच कंपनीत पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळू शकते.