Published on
:
21 Jan 2025, 12:55 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:55 am
बांदा : इन्सुली-कोनवाडा ते कोठावळेबांध मार्गावरील माडभाकरवाडी येथे उच्च दाबाची अकरा केव्ही विद्युतभारित वीजवाहिनी तुटून पडली. ज्या ठिकाणी ही वाहिनी पडली त्या रस्त्यावरील डांबराचा काही भाग जळून गेला. नेहमीच वर्दळीचा रस्ता असूनही सुदैवाने दरम्यान कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या सहा ते सात वर्षात या लाईनचे काम केले असताना ही वायर मधोमध तुटून कशी पडली असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. सदरचे काम निकृष्ट असल्याने असा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
कोठावळेबांध कोनवाडा मार्गावरून अकरा केव्हीची लाईनने कोठावळेबांध येथील ट्रान्सफॉर्मरवर विद्युत प्रवाह आणला आहे. गेल्या सहा ते सात वर्षातच या लाईनचे काम करण्यात आले आहे. सदरचा मार्ग हा झाराप बायपास व जुना मुंबई गोवा महामार्ग यांनाच जोडतो. तसेच या मार्गावरून शाळकरी मुले ये-जा करत असतात त्यामुळे या मार्गावर दिवसभर रहदारी असते.
सोमवारी सकाळी 11 केव्हीची लाईन तुटून डांबरी रस्त्यावर पडली. दरम्यान तेथून जाणार्या एका पादचार्याच्या निदर्शनास आले. विद्युतभारित वायर डांबरावर पडल्याने डांबर जळत असल्याने त्याला संशय आला. त्याने लागलीच आरडाओरड करून तेथून जाणार्याना रोखले, त्यामुळे अनर्थ टळला. याबाबतची माहिती संबंधित विभागाला देऊन उपस्थित अधिकार्यांना ग्रामस्थांनी जाब विचारला.