स्थानिक शेतीमालाला, पाळीव प्राणी व जनतेला मुबलक पाणीपुरवठा मिळण्यासाठी लांजा तालुक्यात एकप्रकारे जलयुक्त चळवळ रुजली आहे. काही वर्षांच्या तुलनेत लांजा तालुक्यात शासनाच्या जलसंधारण व जलसंपदा विभागाकडून जलयुक्त योजना राबविल्या गेल्या असून, लांजा तालुक्यात तब्बल तेरा धरण प्रकल्प बांधण्यात आले आहेत. त्यामुळे लांजा तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त धरणांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, धरणांसाठी ओळख असलेल्या तालुक्यात जल व्यवस्थापन होणेही तितकेच गरजेचे आहे.
लांजा तालुक्याचा पूर्व भाग हा सह्याद्रीच्या खोर्यांमध्ये वसलेला तर पश्चिम भाग हा सपाट माळरानावर वसलेला आहे. तालुक्यात पूर्वेकडील गावांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची झळ सोसावी लागते तर पश्चिम भागात टंचाईचे प्रमाण कमी असते. धरणे बांधण्याचा मुख्य उद्देश पाणी टिकवून ठेवणे हा असून, धरणांमुळे पाणी साठवून ठेवता येते, सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते यासह पूर नियंत्रण करता येते. लांजा तालुक्यात 1978-79 साला दरम्यान धरणांची मुहुर्तमेढ रोवली गेली आणि एकप्रकारे चळवळ सुरू झाली.
सध्या लांजा तालुक्यात एकूण तेरा धरणे असून, यामध्ये खोरनिनको, वेरवली बेर्डेवाडी, बेनिखुर्द, केळंबे-खेरवसे, झापडे, कोंडये, शिपोशी, कुवे, व्हेळ, गवाणे, पन्हळे, हर्दखळे या गावांमध्ये धरणे व तलावांमध्ये पाणीसाठा केला जातो आहे. लांजा तालुक्यात एकूण तेरा धरणे असून, पालू येथे एक नव्याने धरण प्रकल्प आकार घेत आहे. शासनाच्या जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेली धरण व तलाव यांच्यावर जिल्हा लघु पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. दुर्गम भाग असलेल्या खोरनिनको, शिपोशी, व्हेळ, हर्दखळे, वेरवली बेर्डेवाडी या धरणांच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहाने, बहिस्त व खुल्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करून नदी शेजारील दुर्गम भागातील गावांची जमीन क्षेत्र ओलिताखाली आणली जात आहेत.
दुर्गम भागातील विहिरी, बोअरवेल, अन्य जलस्त्रोत जिवंत ठेवण्याचे काम धरण करत आहेत. बेनिखुर्द, खेरवसे-केळंबे, पन्हळे, कुवे, कोंडये, गवाणे, झापडे, या सपाटीकरण असलेल्या भागातील तलावामधील पाण्यावर जनतेची भिस्त आहे.येथील जलसाठे जिवंत ठेवण्याचे काम तलाव आणि धरणे करत आहेत. माळरानावर असलेल्या फळ, भाजी बागायतदार शेतकर्यांना असणारी धरण, तलाव वरदान ठरत आहेत. लांजा तालुक्यातील धरणे व तलाव यांच्यामुळे त्या त्या परिसरातील जलस्त्रोत वाढत आहेत. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठे क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक
लांजा तालुक्यात धरणांची संख्या वाढत असली तरी दुर्गम भागात पाणी टंचाईला समोरे जावे लागते आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचे सुयोग्य यवस्थापन होणे काळाची गरज आहे. धरण, तलाव पाण्याचे व्यवस्थापन झाल्यास तालुक्यातील पाणीटंचाई कायम दूर होईल.