Published on
:
28 Nov 2024, 9:35 am
Updated on
:
28 Nov 2024, 9:35 am
पूर्णा : तालुक्याच्या निळा येथील शेत शिवारातील गट क्रमांक ९६ मध्ये तोडणी रिक्व्हरीला आलेला ६ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. आज गुरुवार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात ज्ञानोबा गणपती सुर्यवंशी, तूकाराम गणपती सुर्यवंशी, ओंकारेश्वर ज्ञानोबा सुर्यवंशी या शेतकऱ्यांचे ३०० टन ऊस वाया जात सुमारे ९ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विद्यूत वितरणचे उप अभियंता, तहसीलदार, तलाठी यांच्याकडे तक्रार करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
महावितरणचा हलगर्जीपणा शेतक-यांच्या मुळावर
निळा येथील शेतवारात जो ऊस शॉर्टसर्किटमुळे जळला आहे, याला पूर्णा येथील विद्यूत वितरण उपविभागाचे अभियंता, लाईनमेन जबाबदार आहेत. या ऊस क्षेत्रावरुन गेलेल्या ३३ केव्हीच्या तारा गेल्या अनेक दिवसांपासून लोंबकळत होत्या. त्या ओढून घेण्यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी सांगूनही दुर्लक्ष केले. अखेर शॉर्टसर्किट होवून ऊस जळून खाक झाला. गतवर्षी देखील शॉटसर्किटमुळे ऊस जळाला होता, असे नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानोबा सुर्यवंशी यांनी सांगितले.