मुख्यमंत्री कोण? याबाबत अजित पवार यांनी आज गुरुवारी (दि.२८) दिल्लीत बोलताना त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. (Image source-X)
Published on
:
28 Nov 2024, 11:35 am
Updated on
:
28 Nov 2024, 11:35 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अजित पवार यांनी आज गुरुवारी (दि.२८) दिल्लीत बोलताना त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. यामुळे भाजप आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदी कोण? हे ठरवतील. त्यांच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते आज दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलत होते.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आमची आज रात्री ९ नंतर बैठक होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा होईल. मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळात कोण असेल? यावर चर्चा होईल. राज्यात महायुतीचे सरकार आणण्याचे आमचे टार्गेट होते. ते आम्ही पूर्ण केले. आता महायुतीचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. महाराष्ट्रातील जनतेने विक्रम केला. एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेत. आमची जबाबदारी आता वाढली आहे. आमची ही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरची बैठक आहे. आमच्यात एकवाक्यता आहे. अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
आमचीही 'तीच' भूमिका, अजित पवार काय म्हणाले?
शिवसेनेचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल जाहीर केलेले आहे की, पीएम मोदी आणि ज्येष्ठ नेते अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आमचीही तीच भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.
'विरोधकांना अपयश, म्हणून 'ते' EVMला दोष देताहेत'
'ईव्हीएम'बाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या संशयाबद्दल बोलताना ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम ठीक होते. कारण निकाल त्यांच्या (महाविकास आघाडीच्या) बाजूने लागला होता. विधानसभा निवडणुकीत निकाल वेगळा लागला. म्हणून ते ईव्हीएमला दोष देत आहेत..." मतदानादिवशी सकाळी गारठा होता. खरं मतदान सकाळी ९ नंतर सुरु झाले. साधारणतः ६ वाजण्याच्या आत जे मतदार रांगेत उभे होते; त्यांना मतदानासाठी आत घेण्यात आले, असे अजित पवार यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीत जेवढे यश मिळायला हवे तेवढे मिळाले नाही. पण विधानसभेला आम्हाला चांगले यश मिळाले. १ लाखापेक्षा जास्त मतांनी आपले उमेदवार निवडून आले. आता विरोधक हे EVM चे षडयंत्र असल्याचे बोलत आहेत. विरोधकांना अपयश आले. त्यामुळे ते अशी तक्रार करत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले आहे.
'डिसेंबरनंतर दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊ'
"आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता. त्यासाठी आता अधिक काम करण्याची गरज आहे, आम्ही लढू आणि आम्ही यशस्वी होऊ." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिसेंबरनंतर आपण दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊ. पुढे कसे जायचे त्यावर त्यात मंथन करू. यंग जनरेशनला आपणे पुढे आणणार आहोत. महाराष्ट्रात महिला मतदारांनी आपल्याला चांगली साथ दिली. लोकांनी मोठा विश्वास दाखवला आहे. त्याला पूर्ण करायचे आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी दिल्लीतील निवडणूक लढवणार
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "आता आमचा पक्ष ३ राज्यांत मान्यताप्राप्त पक्ष आहे. आम्ही आता थांबणार नाही. आम्ही आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवू. आमचा पुढचा टप्पा दिल्ली (विधानसभा) निवडणूक आहे. आम्ही दिल्लीतील निवडणूक लढवू आणि मला खात्री आहे की आम्ही इथे आमचे खाते उघडू आणि यश मिळवू..."