आज सामाजिक चळवळी संपल्यात जमा:माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केली खंत
1 hour ago
2
आपल्या देशाला समाजासुधारकांची, संत- महंतांची दीर्घ परंपरा आहे. या समाजसेवकांनी आपल्याला एक केले. अभिजन महाजन विरुद्ध आठरा पगडा जातीचे बहुजन हा लढा आपण बघितला आहे. दुर्दैवाने आज बहुजन विरुद्ध बहुजन असे चित्र आज बघायला मिळत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक सामाजिक, राजकीय चळवळींमधून आपला समाज निर्माण झाला आहे, परंतु आज सामाजिक चळवळी संपल्यात जमा झाल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत, माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांना नुकताच अ. भा. दलित साहित्य अकादमीतर्फे 'सद्गुरु कबीर राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला यानिमित्ताने डि.सी. मिशनच्या अहिल्याश्रम सभागृहात आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्यदर्शन या एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या एक दिवसीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उल्हास पवार बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर आचार्य रतनलाल सोनग्रा, डि.सी. मिशन, पुणेचे अध्यक्ष देवेंद्र टी. रजपूत, डी.सी. मिशनचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, बार्टीचे माजी महासंचालक डी. आर. परिहार, सरकार निंबाळकर, विठ्ठल गायकवाड, शिल्पा शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते कर्मयोगी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यगौरव शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना उल्हास पवार म्हणाले की, आज काही स्वयंसेवी संस्था चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र त्या तात्कालिक आहेत. सामाजिक सुधारणा किंवा समस्या सोडविण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग नाही. आज विठ्ठल रामजी शिंदे यांनी उभरलेल्या संस्थेत महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त रतानालाल सोनग्रा यांच्यासारख्या एका चांगल्या साहित्यिक, पत्रकाराच्या साहित्यावर, नाटकावर चर्चा घडते आहे, हे अतिशय चांगले आहे. सामाजिक अभिसरणांमध्ये त्यांचे योगदान अमूल्य असल्याचेही पवार यांनी नमूद केले. रतनलाल सोनग्रा म्हणाले की, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डी. सी. एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून एकोणिसाव्या शतकात एक क्रांती केली. या अहिल्याश्रम मध्ये अनेक दिग्गज घडले आहेत. त्यांचे कार्य पोहचवण्यात आपण कमी पडलो आहोत, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या शाळा देशभर निर्माण केल्या होत्या, दुर्दैवाने शासन पातळीवर त्यांच्या कार्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. आज शिंदे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्याची गरज आहे, मात्र त्यांच्यावरील साहित्य मराठी शिवाय इंग्रजी किंवा हिंदी मध्ये नाही यामुळे कदाचित त्यांचे कार्य देशपातळीवर पोहोचले नाही, परंतु मी त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)