उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Published on
:
28 Nov 2024, 3:32 pm
Updated on
:
28 Nov 2024, 3:32 pm
पालघर : डहाणू सारणी येथील पिंकी डोंगरकर या गरोदर मातेला उपचारासाठी वलसाड येथे नेत असताना तिचा आरोग्य यंत्रणांच्या त्रुटीमुळे वाटेत मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. या धक्कादायक घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य यंत्रणेविषयी आज (दि.२८) खेद व्यक्त केला. या दुःखद घटनेनंतर गोऱ्हे यांनी आरोग्य व आदिवासी विभागाला सक्त सूचना देऊन आढावा घेण्याचे व ग्रामीण भागातील गरोदर महिलांना आवश्यक ते उपचार मिळाले पाहिजेत, असे सक्त निर्देश दिले आहेत.
दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत. यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या-पाड्यात आढावा घ्यावा, अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
पालघर जिल्ह्यातील डहाणूत सारणी येथील पिंकी डोंगरकर या मातेला रुग्णवाहिका मिळण्यात उशीर झाल्याने तिला वलसाड येथे उपचारासाठी नेत असताना अर्ध्या रस्त्यात तिचा व गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती.याबाबत 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी व्यक्त होत प्रशासनाला या सूचना केल्या आहेत. मृत मातेच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. आरोग्य विभागामार्फत विविध टप्प्यामध्ये गरोदर महिलांच्या तपासण्या वेळेवर होत नसल्याचे यामधून अधोरेखित होत आहे, असे गोऱ्हे यांनी म्हटले असून राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालघर जिल्ह्यात माता मृत्यूदर, कुपोषण याचे प्रमाण जास्त आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सर्व योजना राबवण्यासाठी फेर आढावा घेऊन गरजूंना त्याचा जास्तीत जास्त लाभ झाला पाहिजे आणि केलेल्या उपाययोजना उपसभापती कार्यालयास अवगत कराव्यात असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिघातील गावामध्ये गर्भवती महिलांची संख्या व त्यांच्या आरोग्याबाबत स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने आढावा बैठक घ्यावी, असेही गोऱ्हे यांनी सूचित केले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदिवासी दुर्गम क्षेत्रात प्राधान्याने भरावीत, अशा क्षेत्रात प्रत्येक ४० किलोमीटर अंतरावर एक सुसज्ज स्त्री रूग्णालयाची स्थापना करण्यात यावी, अधिकच्या रुग्णवाहिका, बोट रुग्णवाहिका आदिवासी क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशाही सूचना गोऱ्हे यांनी या प्रकारानंतर केल्या आहेत.
नंदुरबार, अमरावती, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, गोंदिया येथील अतितत्काळ परिस्थितीत रूग्णांना पाडे, गाव, निवासी वस्त्या येथून नजीकच्या रूग्णालयात जलदगतीने पोहोचविता यावे, याकरिता त्या परिसरात रस्ता निर्मिती, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. यामुळे प्रत्येक रूग्ण उपजिल्हा तथा जिल्हा रूग्णालयाशी जोडला जाईल अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याआधीच दिल्या आहेत.