महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहेत. निकालानंतरचा आज सहावा दिवस आहे. पण तरीदेखील महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. विशेष म्हणजे जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचाली होताना दिसत नाहीय. या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. महायुतीला या निवडणुकीत तब्बल 230 जागांवर यश मिळालं आहे. असं असताना महाराष्ट्र सत्तास्थापनेचा पेच अजून सुटलेला नाही. महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. त्यापैकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्रीपदावरुन दावा सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपला भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असेल असं त्यांनी कालच जाहीर केलं. यानंतर आता खातेवाटपाचा पेच कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.
भाजप आणि शिंदे गटात गृहखात्यावरुन वाद सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार गृहखातं हे शिवसेना शिंदे गटाला हवं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण भाजप गृहखातं सोडायला तयार नाही, अशीदेखील सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या आज रात्रीच्या बैठकीत गृह खात्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे. तर शिंदेंना गृहखातं हवं आहे. पण हे खातं सध्या भाजपकडे आहे.
नेमक्या वाटाघाटी काय होणार?
गृहखातं हे महत्त्वाचं खातं मानलं जातं. हे खातं आपल्याकडे असावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. यापूर्वी हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. पण ते खातं आपल्याला मिळावं, अशी शिंदे गटाची मागणी आहे. एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं जाईल का? याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. तरीदेखील त्यांच्याचकडे ते खातं पून्हा एकदा जाऊ शकतं, अशी देखील एक चर्चा आहे.
हे सुद्धा वाचा
महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपैकी साडेसात वर्ष गृहखातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. केवळ महाविकास आघाडीच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती. या दरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप स्वत: मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणताही आरोप नाही. त्यामुळे हे खातं फडणवीस यांच्याकडेच जाऊ शकतं. पण मुख्यमंत्रीपद भाजपला दिलं तर गृहखातं आमच्यासाठी सोडा, अशी शिंदे गटाची मागणी असल्याची माहिती आहे. अर्थात अमित शाह यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कशाप्रकारे वाटाघाटी केल्या जातात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.