परभणी (Parbhani):- जिल्ह्याच्या किमान तापमानात घट होत असून थंडी वाढत आहे. किमान तापमान १० अंशाच्या खाली आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शितलहर आली असून कुडकुडविणारी थंडी वाढली आहे. सोमवार २५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सीअस एवढे नोंदविल्या गेले.
तापमान कमी झाल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे
मागील आठवडाभरापासून जिल्ह्याच्या तापमानात (temperature) घट होत आहे. किमान तापमान ११ ते १३ अंशाच्या दरम्यान होते. सोमवारी तापमान घटले. ९.६ अंश सेल्सीअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यात असलेल्या सरासरी तापमानाचा विचार केला तर सदरचे तापमान ३ अंशाने कमी आहे. सरासरी नोव्हेंबर महिन्यात या कालावधी मध्ये किमान तापमान १२.८ अंश सेल्सीअस असते. मात्र यंदा हे तापमान कमी झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सीअस इतके असते. मात्र सध्या हे तापमान २८.३ अंश सेल्सीअस एवढे आहे. तापमान कमी झाल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे.
सकाळ, सायंकाळच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात
थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरीक उबदार कपड्यांचा सहारा घेत आहे. सकाळ, सायंकाळच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. थंडीमुळे व्यायाम करणार्यांची संख्याही वाढली असून पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत आहेत. शहरातील व्यायाम शाळा, जीम फुल झाल्या आहेत. सुक्या मेव्याची मागणी देखील वाढली असून परभणी शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार या ठिकाणी व्यवसायीकांनी सुक्या मेव्याची दुकाने थाटली आहेत.