घंटागाडीने धडक दिल्याने दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.File photo
Published on
:
26 Nov 2024, 2:00 pm
Updated on
:
26 Nov 2024, 2:00 pm
धुळे : शहरातील सुभाष नगर परिसरात घंटागाडीने धडक दिल्याने दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून चालकाच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष नगर परिसरातील बर्फ कारखान्या जवळील रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका घंटागाडीने दीड वर्ष वयाच्या शौर्य बडगुजर या बालकाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर परिसरात नागरिकांनी तातडीने या बालकाला रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या अपघातानंतर घंटागाडीच्या चालक आणि सहाय्यकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या अपघातामुळे घंटागाडी वरील बेबंद शाहीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. घंटागाडीचे चालक वळणावर देखील भरधाव वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेने दखल घेऊन संबंधितांना सूचना करावी, अशी मागणी देखील होते आहे. या संदर्भात आता आझाद नगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.