पिंपरी-चिंचवड अन् मावळात महाआघाडीचे पानिपत!file photo
Published on
:
24 Nov 2024, 5:03 am
Updated on
:
24 Nov 2024, 5:03 am
Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळमध्ये महाआघाडीचे पानिपत करून महायुतीच्या चारही उमेदवारांनी विजयाचा पताका फडकवला. सर्व पक्षीय नेत्यांना अंगावर घेऊन सुनील शेळके यांनी मोडीत काढलेला मावळ पॅटर्न, भोसरीत महेश लांडगे यांची हॅट्ट्रिक, घराणेशाहीच्या आरोपाला शंकर जगताप यांनी लाखांच्या मताधिक्याने दिलेले प्रत्युत्तर आणि पिंपरीत अण्णा बनसोडे यांचा तिसर्यांदा विजय हे या निकालाचे वैशिष्ट्य ठरले.
पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष होता. राज्यातील सत्तांतराच्या महानाट्यानंतर महायुतीचा उदय झाला आणि दोन्ही पक्षातून विधानसभेसाठी इच्छुक असणार्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी धावाधाव झाली आणि विधानसभा निवडणकीचे चित्र पालटले.
चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा दबदबा असणार्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय मिळविला. मात्र, यावेळी त्यांचे दीर शंकर जगताप यांनी तयारी सुरू केल्याने कौटुंबिक कलह निर्माण झाला. याचवेळी शंकर जगताप यांना भाजपमधील अंतर्गत
विरोधालाही सामोरे जावे लागले. मित्रपक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनीही विधानसभेवर दावा करून त्यांची कोंडी केली. या तीनही परीक्षांना सामोरे जाऊन उमेदवारी मिळविण्यात त्यांना यश मिळाले. दुसरीकडे पारंपरिक मतदारसंघ असणार्या चिंचवडमध्ये भाजपचा बीमोड करण्याचे आव्हान विरोधकांसमोर होते. गतवर्षीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले राहुल कलाटे यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळविली.
जगतापांविरोधात त्यांनी मोठी ताकद उभी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक तिरंगी होईल, अशी अपेक्षा होती. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तर महाआघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे आदींच्या सभा झाल्या.
भाजपच्या नारांजांची मनधरणी करण्यात जगताप यांना यश मिळाले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा करिष्मा आणि सुशिक्षित-शांत-सुज्ञ स्वभावाचा उमेदवार म्हणून शंकर जगताप यांची मतदार संघात निर्माण झालेली ओळख याचा महायुतीला फायदा झाला. जगताप यांनी 1 लाखांवर मताधिक्याने महाआघाडीला मोठ्या फरकाने पराभूत केले.
भोसरीत अनपेक्षित घडामोडी
भोसरीतील भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे हॅट्ट्रिक करण्याच्या हेतूने आखाड्यात उतरले होते. महाआघाडीकडे तोडीस-तोड उमेदवार नसल्याने सुरुवातीस ही लढत एकतर्फी वाटत होती. मात्र, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी महाआघाडीच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविल्यानंतर या लढतीमध्ये अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली. भाजपच्या नाराज रवी लांडगे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला.
गव्हाणे यांचे नाव जाहीर होण्यास विलंब झाला मात्र, प्रचाराचा धुरळा उडवित त्यांनी लढतीत रंगत आणली. यातच भाजपच्या काही नगरसेवकांनी लांडगे यांची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी सभांनी ही लढत लक्षवेधी ठरली. व्होट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध सुरू करा.. असा नारा फडणवीस यांनी येथील सभेत दिला. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते, स्थानिक नेते आणि ऐनवेळी दगाफटका केलेल्या नगरसेवकांनी घेरले असताना महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी मताधिक्याने विजयाची हॅट्ट्रिक साधली.
मावळात चक्रव्यूह भेदला
विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी महाआघाडीने मावळामध्ये उमेदवारच दिला नाही. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाआघाडीसह चक्क भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उघडपणे साथ दिल्याने आमदार शेळके चक्रव्यूहात अडकले होते. मात्र, त्यांनी 1 लाखांहून अधिकच्या मताधिक्याने हा चक्रव्यूह भेदत तालुक्यातील आपले वर्चस्व कायम राखले. तब्बल 25 वर्षे सत्ता असणार्या मावळ तालुक्यातील राजकारण पुन्हा आपल्या हातात घेण्याचे स्थानिक भाजप नेत्यांचे स्वप्न पुन्हा भंगले.
रिचेबल असल्याचे अण्णांकडून सिद्ध!
अजित पवार यांच्या जवळचे मानले जाणारे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवरच विरोधकांनी आक्षेप घेत टीका केली होती. मतदार संघातील प्रश्न व सामान्य नागरिकांसाठी ते नॉट रिचेबल असतात असा आरोप करण्यात आला होता मात्र, महाआघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांचा पराभव करून त्यांनी तिसर्यांदा विजय मिळविला आणि मतदारांशी त्यांचा रिच असल्याचे सिद्ध केले.