Published on
:
27 Nov 2024, 5:40 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:40 am
नाशिक : यंदा खरीप कांद्याच्या आवकमध्ये झालेली घट आणि टोमॅटोच्या आवकमध्ये झालेली वाढ यामुळे कांदा वधारला असून, टाेमॅटोची लाली कमी झाली आहे.
खरिपाच्या लाल कांद्याला प्रतिक्विंटल 4,000 ते 5,000 भाव मिळत असून, किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलोने विक्री हाेत आहे, तर टोमॅटोला प्रतिक्रेट ४५० रुपये भाव मिळत असून, किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. पुढील आठवड्यात टोमॅटोचे भाव अजुून कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बाजार समितीत खरिपाच्या कांद्याची आवक अद्यापही कमी असल्याने भाव कमी होत नसल्याने ग्राहक चिंतेत आहेत. परतीच्या पावसाने लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जून - जुलैमध्ये लावण्यात आलेल्या कांद्याचे पीक हे ऑक्टोबरमध्ये काढले जाते. मात्र यंदा पिकाचे नुकसान झाले. उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारातील आवक मर्यादित असून, याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. कांद्याचे भाव कमी होताना दिसत नाही.
मागील हंगामात राज्यात दोन लाख ८५ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यंदा त्यात वाढ झाली. तीन लाख ८१ हजार हेक्टरवर कांदा पीक घेतले गेले. त्यातही लेट खरिपाची लागवड एक लाख ६६ हजार हेक्टरवर करण्यात आली. यंदा मात्र केवळ ५५ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाल्याने आवकमध्ये घट झाली आहे.
दुसरीकडे टोमॅटोच्या आवकमध्ये वाढ होत असल्याने भावात घसरण होत आहे. नाशिकच्या शरदचंद्र कृषी मार्केटमध्ये जिल्ह्यातील सिन्नर, पिंपळगाव खांब, शिंदे पळसे, नांदूरमानूर, बेलगाव ढगा, त्र्यंबक आदी भागांतून टोमॅटोची आवक होते, तर गुजरात, राजस्थान, वापी, जयपूर आदी भागांत निर्यात होते. सद्यस्थितीत शरदचंद्र मार्केटमध्ये टोमॅटोस प्रतिक्रेट १०० रुपयांपासून अधिकतम ४५० रुपये भाव मिळत आहे. सिन्नरमधून सर्वाधिक आवक होत आहे.