सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे 2 दिवसीय आयपीएल 2025 मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमधून एकूण 182 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या 182 पैकी 62 खेळाडू हे परदेशी आहेत. तर 8 खेळाडूंना आरटीएमद्वारे त्यांच्या मुळ संघांनीच पुन्हा घेतलं. या 182 खेळाडूंवर एकूण 10 संघांनी 639.15 कोटी रुपये खर्च करण्यात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर वैभव सूर्यवंशी याने सर्वात युवा कोट्यधीश खेळाडू होण्याच बहुमान मिळवला. तसेच अनेक खेळाडूंवर कोटींची बोली लागली. तर तब्बल 395 खेळाडू हे अनसोल्ड राहिले. त्या अनेक 395 खेळाडूंपैकी एक दुर्देवी खेळाडू म्हणजे टीम इंडियापासून गेली काही वर्ष दूर असलेला युवा पृथ्वी शॉ.
पृथ्वी शॉ याला त्याचा गेल्या काही महिन्यांमधील हलर्गजीपणा हा आयपीएल ऑक्शनमध्ये भोवला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिस्तभंग, खेळाडू म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष, धावांचा दुष्काळ आणि वैयक्तिक जीवनातील काही वादांमुळे पृथ्वीच्या क्रिकेट कारकीर्दीला ग्रहण लागंल. मुंबईकर पृथ्वीने कसोटी पदार्पणात शतक ठोकून त्याची छाप सोडली होती. पृथ्वीकडे सचिन तेंडुलकर याचा क्रिकेटमधील वारसदार म्हणून पाहण्यात आलं. मात्र पृथ्वीच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. त्यामुळे पृथ्वीला या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड रहावं लागलं.
पृथ्वीला 8 कोटींचा चूना!
स्वत: पृथ्वीला कुणी खरेदी करेल का? याबाबत शंका होती, त्याचं कारण म्हणजे त्याची बेस प्राईज. पृथ्वीने त्याची बेस प्राईज 75 लाख रुपये इतकी निश्चित केली होती. मात्र पृथ्वीवर एका टीमनेही बोली लावली नाही. त्यामुळे पृथ्वी अनसोल्ड राहिला आणि त्याला 8 कोटींचा चूना लागला. पृ्थ्वीची 2023 आणि 2024 या दोन्ही हंगामात 8 कोटी इतकी किंमत होती. मात्र यंदा पृथ्वी अनसोल्ड राहिला. त्यामुळे पृथ्वीला 8 कोटींचा चूना लागला, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.
हलगर्जीपणा, फिटनेस, शिस्तभंग, मोठी खेळी करण्यात अपयशी आणि संधीचा फायदा न उचलता येणं, पृथ्वीच्या या मुद्द्यांवरुन टीम इंडियाचा माजी दिग्गज मोहम्मद कैफ याने भाष्य केलं.
मोहम्मद कैफ काय म्हणाला?
पृथ्वी मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहणं ही त्याच्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याचं कैफने म्हटलं. पृथ्वीला लाज वाटायला हवी की त्याला कुणीच घेतलं नाही, असंही कैफने म्हटलं. पृथ्वी दिल्ली कॅपिट्ल्सकडून खेळायचा तेव्हा मोहम्मद कैफ दिल्ली कॅपिट्ल्सच्या कोचिंग पॅनेलमध्ये होता. कैफने जिओ सिनेमावर बोलताना पृथ्वीला दिल्ली टीमने पाठींबा दिल्याचं म्हटलं. दिल्ली टीमने पृथ्वीला फार पाठींबा दिला. पृथ्वी एकमेव खेळाडू आहे जो त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली नाही, अशी तक्रार करु शकत नाही, अस कैफने नमूद केलं.
आयपीएल 2025 साठी दिल्ली टीम
रिटेन खेळाडू : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल.
नवे खेळाडू : मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेजर मॅकगर्क, टी नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नलकांडे, विपराज निगम, दुष्मंता चमीरा, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, मानवंत कुमार, अजय मंडल आणि डोनोवन फरेरा.