बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांची हिंदू एकता यात्रा उत्तर प्रदेशच्या झांसी येथे पोहोचली आहे. या यात्रे दरम्यान एका व्यक्तीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर मोबाइल फेकून मारला. हा मोबाइल धीरेंद्र शास्त्री यांच्या गालाला लागला. धीरेंद्र शास्त्री या यात्रेत आपल्या भक्तांसोबत पायी चालत आहेत. त्यावेळी ही घटना घडली. चालत असताना माइकद्वारे ते भक्तांना संबोधित करत होते. या दरम्यान ते म्हणाले की, “कोणीतरी मला फुलांसोबत मोबाइल फेकून मारला. मला तो माबाईल मिळाला आहे”
धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू एकता यात्रेचा आज सहावा दिवस आहे. बागेश्वर धाम ते ओरछा पर्यंतच्या त्यांच्या या यात्रेला जनतेच प्रचंड समर्थन मिळतय. हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्यासोबत पायी चालत आहेत. ज्या रस्त्यावरुन ही यात्रा जातेय, तिथे फुलांनी पदयात्रेच स्वागत केलं जातेय. 21 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या यात्रेत अभिनेता संजय दत्त आणि द ग्रेट खली सहभागी झाले होते.
‘एकच लक्ष्य, सनातन धर्म मजबुती’
त्याशिवाय अनेक नेत्यांनी या यात्रेच समर्थन केलय. यात भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, भाजप आमदार राजेश्वर शर्मा आणि काँग्रेस आमदार जयवर्धन सिंह आहेत. धीरेंद्र शास्त्री यांनी या यात्रेची सुरुवात करताना सांगितलं होतं की, आपल्या सर्वांना जाती-पातीच्या बाहेर यायचं आहे. ‘जात-पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई-भाई’ असा त्यांनी नारा दिला. आपल्या भक्तांना संबोधित करताना धीरेंद्र शास्त्री सांगतात की, ‘एकच लक्ष्य, सनातन धर्म मजबुती’