Published on
:
26 Nov 2024, 8:55 am
मराठवाड्यातील काही राजकीय घराण्यांवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखविला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत १९९९ नंतर पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला. ते सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी केंद्राचे मंत्रिपदही भूषविले. त्यांचे पुत्र संतोष दानवे (भाजप) हे भोकरदनमधून, तर कन्या संजना जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून कन्नड मतदारसंघातून विधानसभेवर गेल्या आहेत.
मराठवाड्याचे भगीरथ मानले गेलेले दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण हेदेखील राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे पिता-पुत्र राज्यातील काँग्रेसचे आधारस्तंभ होते. मात्र, पक्षांतर्गत त्रासामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार यशस्वी होऊ शकला नाही. चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. त्या भोकर मतदारसंघातून विजयी झाल्या.
बीड जिल्ह्यात माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांचा मोठा संपर्क आणि दरारा होता. लोकसभेची निवडणूक त्यांनी तीनवेळा जिंकली होती. त्यांचा राजकीय वारसा पुत्र जयदत्त आणि डॉ. भारतभूषण यांनी पुढे चालविला. जयदत्त क्षीरसागर हे १९९० ते २०१९ अशी सलग २९ वर्षे आमदार होते. आता त्यांचे पुत्र रवींद्र क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार गट) बीडमधून विजयी झाले आहेत. त्यांनी आपलेच चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला.
धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिक्य
मुंडे हे बीडचे दुसरे राजकीय घराणे. दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे बंधू स्व. पंडितअण्णा मुंडे यांचे पुत्र धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार गट) परळी मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. धनंजय यांच्या चुलत भगिनी, भाजप नेत्या पंकजा मुंडे या काही महिन्यांपूर्वीच विधान परिषदेवर निवडून गेल्या आहेत.
देशमुख घराण्यातील वारसदारांना मतदारांनी कौल
लातूर जिल्ह्याने देशाला, राज्याला तीन नेते दिले. शिवराज पाटील चाकूरकर, स्व. शिवाजीराव निलंगेकर आणि विलासराव देशमुख. यापैकी निलंगेकर आणि देशमुख घराण्यातील दोघा वारसदारांना मतदारांनी कौल दिला. स्व. शिवाजीराव यांचे नातू संभाजीराव दिलीपराव निलंगेकर आणि अमित देशमुख हे अनुक्रमे निलंगा आणि लातूर शहर मतदारसंघातून निवडून आले. अमित यांनी चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना शैलेश पाटील यांचा पराभव केला. अमित यांचे बंधू धीरज देशमुख हे मात्र लातूर ग्रामीणमधून पराभूत झाले.
नमिता मुंदडा दुसऱ्यांदा विधानसभेवर
केज या राखीव मतदारसंघाचे १९९० ते २००९ दरम्यान प्रतिनिधित्व केलेल्या दिवंगत नेत्या, माजी मंत्री विमल मुंदडा या सलग पाचवेळा निवडून आल्या. २०१९ मध्ये मतदारांनी त्यांच्या स्नुषा नमिता मुंदडा यांना मतदारांनी संधी दिली होती. त्या आता दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय, २० वर्षांहून जास्त काळ मंत्री राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील (भाजप) हे तुळजापूरमधून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे कुलदीप पाटील यांचा पराभव केला.