Published on
:
22 Nov 2024, 3:15 am
Updated on
:
22 Nov 2024, 3:15 am
Crime in Pune: वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागातील एका शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी 14 वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मांजरीतील एका शाळेत नववीत फिर्यादी मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल केलेला मुलगा देखील त्याच्या वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी (दि.19 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास मुलगा वर्गात बसला होता. त्या वेळी वर्गातील दुसरा मुलगा पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला.
जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचार्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे तपास करत आहेत.