विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं, राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचं देखील कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली, मतदानासाठी ज्या बसमधून ईव्हीएम नेण्यात आले त्या बसच्या शिटखाली गुरुवारी सायंकाळी 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल विद्यार्थ्यांना दिसून आले. सदर विद्यार्थ्यांनी 86 हजारांची ही रक्कम एसटी बसच्या वाहक सविता आडांगळे यांच्याकडे सुपूर्द केली. प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे. ही रक्कम नेमकी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोपरगाव आगाराची बस MH 40 Y 5679 या क्रमांकाची बस स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली. त्यानंतर त्याच बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव अशा बस फेऱ्या केल्यानंतर संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस धामोरीच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या सीटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल मिळून आले.
साईराज कदम नावाच्या विद्यार्थ्याने तसेच त्याच्या सहकाऱ्यांनी हे बंडल बसमधील संजीवनी इंग्लिश मीडियमचे कर्मचारी रोहित होन आणि सचिन भालके यांच्याकडे दिली. त्यांनी ते नोटांचे बंडल महिला वाहक सविता अडांगळे यांच्याकडे दिले. त्यानंतर सविता अडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही याबाबत माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन जमा केली. ही रक्कम 86 हजार पाचशे रुपये एवढी असल्याची माहिती देण्यात आली आहे. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तेथे काम करणारे कर्मचारी तसेच महिला वाहकाने प्रामाणिकपणा दाखवत सदरची रक्कम जमा केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.