वारजे येथे महामार्गावर गॅसचा टँकर उलटला; सुदैवाने जीवितहानी टळलीPudhari
Published on
:
25 Nov 2024, 6:22 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:22 am
Pune News: वारजे येथे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वर्धमान पेट्रोल पंपासमोर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅसचा टँकर उलटला. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावर सुमारे पाच ते सहा तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
कंटेनरचालकावर वारजे पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शेषनाथ यादव (वय 33) असे या टँकरचालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.वारजे येथील महामार्गावरून मुंबईहून साताराकडे इंडेन कंपनीचा एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टँकर भरधाव वेगाने जात होता.
वर्धमान पेट्रोल पंपासमोर हा टँकर आला असता चालकाचा त्यावरील ताबा सुटला. त्यानंतर या टँकरची रस्त्यावरील दुभाजकाला धडक बसून तो महामार्गावर उलटला. सुदैवाने महामार्गवर त्या वेळी वाहने नसल्याने मोठा अपघात टळला. या अपघातामुळे महामार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी तीनदरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, वारजे वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तासभरानंतर महामार्गावर टँकर क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरळीत केली.
टँकर मोठा असल्याने तसेच त्यात गॅस भरलेला असल्याने तो हलविण्यासाठी मोठे क्रेन मागवावे लागले. अखेर पाच तासांनंतर क्रेन उपलब्ध झाल्यावर वारजे माळवाडी पोलिस, वाहतूक पोलीस, महामार्गाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच क्रेनच्या साहाय्याने हा टँकर महामार्गावरून सुरक्षित ठिकाणी हलवित वाहतूक पूर्ववत केली.
गॅस गळतीच्या शक्यतेने नागरिकांत भीती
वारजे येथील महामार्गावर एलपीजी गॅसचा टँकर उलटल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पाच ते सहा तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टँकरची धडक जोरदार असल्याने चालकाची केबीन रस्त्याच्या दुसर्या बाजूला जाऊन पडली. दरम्यान, हा टँकर गॅसने भरलेला असल्याने त्यातून गळतीची होण्याची शक्यता असल्याने काही वेळा परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.