Published on
:
27 Nov 2024, 5:06 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:06 am
रायगड : रायगड जिल्ह्यात महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांची ताकद वाढली असून, महाआघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेसची ताकद कमालीची घटली असल्याचे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी 48.92 टक्के मतदान महायुतीच्या उमेदवारांना झाले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 39.67 टक्के मतदान मिळविण्यात यश आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांना 10.43 टक्के मतदान झाले असून 0.98 टक्के मतदारांनी नकाराधिकार बजावला आहे.
जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली. निवडणूकीत जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांच्या महायुतीच्या बाजूने कौल दिला. जिल्ह्यातील सातही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पनवेल, उरण, पेण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर अलिबाग, महाड, कर्जत मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट), श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात 17 लाख 29 हजार 302 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 48.92 टक्के म्हणजेच 8 लाख 45 हजार 914 मतदारांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांच्या महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले. तर 39.67 टक्के म्हणजे 6 लाख 86 हजार 59 मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले.
मनसे तसेच इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांना 10.43 टक्के म्हणजे 1 लाख 80 हजार 429 मतदारांनी मतदान केले. तर 0.98 टक्के म्हणजे 16 हजार 909 मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला. रायगड जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत वाढत होती. मात्र प्रत्यक्षात निकालात आघाडीत समन्वय नसल्याचे परिणाम दिसून आले आहेत. आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकामध्ये या निकालाचे मोठे परिणाम होणार आहेत.