Raj Thackrey on Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – आपली भाषा….

2 hours ago 1

मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरे काय म्हणाले ?Image Credit source: societal media

कालचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय ऐतिहासिलक होता. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी समोर आली. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर जाहीर केला. गेल्या अनेक वर्षां पासून या संदर्भात मागणी करण्यात येत होती. अखेर राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. दरम्यान केंद्र सरकारचा हा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय ?

X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरील अधिकृत अकाऊंटवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट जशीच्या तशी…

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती.

तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’ ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार.

मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया.

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत…

• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा. • या भाषेत प्राचीन साहित्य हवं. • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. •’अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

२०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो… तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील…

•मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.

•भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.

•प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.

•महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.

•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.

* प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.

* अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.

ही भाषा पराक्रमाची

या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मनसेची मागणी होती

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन.

जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे

प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे.

पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन… अशी पोस्ट राज ठाकरे यांनी X वर केली आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली बातमी

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात येणार असल्याची गोड बातमी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. “आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article