अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात आता एक मोठ, नवं वळण आलं आहे. लीलावती हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टनुसार, सैफ अली खान हा 16 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाला. म्हणजे वांद्रे येथील त्याच्या घरात झालेल्या हल्ल्यानंतर 1 तास 41 मिनिटांनी तो हॉस्पिटलमध्ये आला. विशेष म्हणजे सैफ अली खानचं घर हे लीलाती हॉस्पिटलपासून अवघ्या 10-15 मिनिटांच्या अंतरावर आहे. पण त्याच्या रिपोर्टनुसार त्याच्यावर मध्यरात्री 2.30 च्या आसपास हल्ला झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये 4.11 ला पोहोचला.
वांद्रे पोलिसांकडे सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात सैफ अली खानला त्याचा मॅनेजर आणि ‘मित्र’ अधिकारी जैदी यांनी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून झैदी यांनीच त्यांना रुग्णालयात आणले असावे, असे सूचित होते. या रिपोर्टमध्ये झैदीचे नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे ‘मित्र’ विभागात नमूद केले आहेत. त्यानेच रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत.
मात्र, सैफ अली खानला रुग्णालयात कोणी आणले याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र काही काळापूर्वी मीडियाशी संवाद साधताना एका डॉक्टरने असा दावा केला होता की सैफ अली खान हा त्याचा 8 वर्षांचा मुलगा तैमूर अली खानसोबत ऑटोरिक्षाने हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तर इतर काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने ऑटो रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये आणले होते. रिपोर्ट्सनुसार, 23 वर्षीय इब्राहिमने रक्ताने माखलेल्या वडिलांना ऑटोमध्ये बसवले. कारण त्यावेळी ड्रायव्हर घरी नसल्यामुळे कोणतीच गाडी रेडी नव्हती. मात्र सैफच्या मॅनेजरने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सैफ हा घरातील कर्मचाऱ्यांसह ऑटो रिक्षाने रुग्णालयात गेला होता, असे त्याने स्पष्ट केले. एकंदरच या प्रकरणातील घोळ दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.
ऑटोवाल्याचं म्हणणं काय ?
हल्ला झाला त्या रात्री सैफ अली खानला रुग्णालयात नेणारा ऑटोचालक भजन सिंग राणा म्हणाला की, सैफच्या अंगातून खूप रक्तस्त्राव होत होता. त्याच्यासोबत एक लहान मुलगा आणि आणखी एक व्यक्ती होती. सैफ अली खान ऑटोमध्ये चढताच त्याने रिक्षा चालकाला पहिला प्रश्न विचारला की ‘किती वेळ लागेल?’
16 जानेवारीला काय घडलं ?
16 जानेवारीला मध्यरात्री सैफ अली खानच्या वांद्रे येथील सतगुरु शरण इमारतीतील घरात घुसलेल्या चोराने सैफ अली खानवर अनेक वार केले. त्याला गंभीर जखमा झाल्या. तसेच लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला पाच ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर यांचा समावेश आहे. या जखमांचा आकार 0.5 सेमी ते 15 सेमी पर्यंत होता. .
हॉस्पिटलमध्ये 4 ते 5 तास झालेल्या सर्जरीनंतर डॉक्टरांनी सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये अडकलेली चाकू बाहेर काढल्याचे सांगण्यात आले होते. सैफच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि 17 जानेवारीला त्याला अतिदक्षता विभागातून (ICU) विशेष खोलीत हलवण्यात आले. मंगळवारी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यापूर्वी त्याने त्याला मदत करणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या रिक्षाचालकाचीही भेट घेतली. दरम्यान, सैफवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद फकीरला अटक केली आहे. तो बांगलादेशचा रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे.