विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाननंतर मनसेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे तीन दिवसाच्या नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. पण निराशजनक परिसर्थिती पाहून राज ठाकरे यांनी आपला दौरा अर्धवट सोडला आहे. तसेच मनसेची प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केली जाण्याचेही संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकांपूर्वीच राज ठाकरे यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचा मोठा निर्णय घेतल्याचंही सांगितलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी मरगळ झटकली आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांनी राज्यातील महापालिका निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर सर्वच राजकी पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. मनसेनेही मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर फिरून पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणं, महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन काही सूचना करणं हा त्यामागचा उद्देश होता. तसेच विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाने खचलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणं हाही त्यामागचा हेतू होता. त्यामुळेच राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आले होते.
राज ठाकरे मुंबईच्या दिशेने
पण राज ठाकरे यांना आपला तीन दिवसांचा दौरा अवघ्या एका दिवसातच गुंडाळावा लागला आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचे करण्यात आले होते. त्यांचा हा दौरा अत्यंत मानला जात होता. मात्र, राज ठाकरे यांनी या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. राज ठाकरे यांनी काल पदाधिकाऱ्यांशी एक बैठकही केली. त्यानंतर त्यांनी हा दौरा अर्धवट सोडला आहे. राज ठाकरे यांनी दौरा अर्धवट का सोडला? याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पण पक्षातील निराशजनक स्थिती पाहून त्यांनी हा दौरा अर्धवट सोडल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे आता मुंबईकडे यायला निघाले आहेत.
सहा तास वन टू वन
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेत भाकरी फिरवली जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारणी बरखास्त होणार आहेत. त्याजागी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. नाशिकच्या कालच्या बैठकीत राज ठाकरे यांनी निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना खडसावलं. तसेच सहा तास वन टू वन चर्चा करत नवीन कार्यकारणी नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.