परभणी/ताडकळस (Parbhani) :- येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेचे राजपत्रीत मुख्याध्यापक (Principle)पद गेल्या चोवीस वर्षापासून रिक्त असल्याने येथील शाळेचा कारभार हा प्रभारी मुख्याध्यापकाकडेच आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणी प्रमाणे २०१२ पासून प्रभारी मुख्याध्यापक असलेले गायकवाड यांना पदोन्नती मिळाल्याने सध्या येथील शाळेचा कारभार मात्र एका सहशिक्षीकेकडे आला आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
चोवीस वर्षापासून मुख्याध्यापक पद रिक्त
ताडकळस येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेचे राज्य पत्रीत मुख्याध्यापक पद ३१ ऑगस्ट २००० पासून रिक्त आहे. या ठिकाणी १ सप्टेंबर २००० पासून प्रभारी मुख्याध्यापकावरच शाळा चालते. २१ जुलै २०१२ पासून एस.एस. गायकवाड यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणुन कामकाज पाहिले आहे. नुकतीच त्यांची पालम येथे विस्तार शिक्षण अधिकारी म्हणुन नियुक्ती झाली आहे. यामुळे सध्या येथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. या गंभीर प्रकारामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होताना दिसून येत आहे. पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी परिसरातील शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असत. परंतू आता मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांची (Student)संख्या देखील कमी झाली आहे.
कार्यरत शिक्षकांना देखील मुख्याध्यापक नसल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रकाराची शिक्षण विभागाने दखल घेऊन राजपत्रीत मुख्याध्यापक पद तत्काळ पूर्तता करावी अशी मागणी विद्यार्थी पालकांतुन करण्यात येत आहे.