परभणी (Parbhani):- वाढती लोकसंख्या, दैनंदिन गरजा भागविण्याचा खर्च, शिक्षणावरील खर्च, नोकरी करीअर आदी बाबींचा विचार करुन कुटूंब नियोजनाला प्राधान्य दिले जात आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या आठ महिन्याच्या कालावधीत २ हजार ९९ जणांनी दोन अपत्यावर पाळणा थांबवत कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. कुटूंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने (Department of Health) शस्त्रक्रिया (Surgery) केल्या आहेत.
कुटूंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केल्या शस्त्रक्रिया
एकूण वार्षिक उद्दिष्टाच्या हे प्रमाण ३७.७ टक्के आहे. लहान कुटूंब सुखी कुटूंब असे म्हणत लहान आणि निरोगी कुटूंबाला प्राधान्य दिले जात आहे. दोन अपत्यावर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलगी असो की मुलगा यांच्यात भेदभाव न करता कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. परभणी जिल्ह्यात विविध तालुक्यांसह शहरी व ग्रामीण रुग्णालयात कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. सन २०२४ – २५ या कालावधीसाठी एकूण शस्त्रक्रियेचे ११ हजार ६५० एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये दोन अपत्यावरील शस्त्रक्रिया, बीनटाका शस्त्रक्रिया, पुरुष शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत दोन अपत्यावरील शस्त्रक्रियेचे ५ हजार ५७१ एवढे उद्दिष्ट आहे.
डिसेंबर अखेर २ हजार ९९ शस्त्रक्रिया
डिसेंबर अखेर २ हजार ९९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ३७.७ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. पुरुषांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र कुटूंब नियोजनाचा भार आताही महिलांवरच असल्याचे दिसत आहे. कुटूंब नियोजनासाठी शस्त्रक्रियेबरोबर इतर साधनांचाही वापर केला जात आहे. मागील आठ महिन्यात बिनटाक्याच्या २ हजार ४८३ इतक्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आंतरा इंजेक्शन, छाया गोळ्या, आययुडी तांबी बसविणे, पीपीआययुसीडी तांडी बसविणे तसेच गर्भनिरोधक गोळ्या सारख्या बाबींचा वापर कुटूंब नियोजनासाठी केला जात आहे.