भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.(Pudhari Photo)
Published on
:
24 Jan 2025, 9:29 am
Updated on
:
24 Jan 2025, 9:29 am
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ॲडव्हाँटेज विदर्भ संदर्भात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत असतानाच या घटनेकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले. याबाबतीत माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी स्पष्ट केले.
काही वेळात मिळालेली माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद थांबवित पत्रकार, उद्योजक अशा सर्व उपस्थितांनी या घटनेतील मृतांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी रामटेकचे काँग्रेस खासदार श्याम बर्वे आमदार प्रवीण दटके, ॲडव्हाँटेज विदर्भ आयोजन समिती ॲडचे अध्यक्ष आशिष काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑर्डिनन्स फॅक्टरीतील स्फोट इतका भीषण होता की त्याचे हादरे १५ किमीपर्यंत जाणवले. लोकांना या घटनेची भूकंप झाल्यासारखी जाणीव झाली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
५ जणांना सुरक्षित बाहेर काढले, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी आहेत. सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदतकार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज आहेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.