Published on
:
24 Jan 2025, 2:38 pm
Updated on
:
24 Jan 2025, 2:38 pm
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : परळी शहरात व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde Murder Case) यांची निर्घृण हत्या 21 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालयासमोरच झाली होती. मात्र, तब्बल 14 महिन्यांनंतरही तपास ठप्प असून आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप होत आहेत. मुंडे कुटुंबाने थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी मदतीची हाक दिली आहे.
परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या 21 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालय आणि तहसील कार्यालय परिसरात झाली होती. हत्येचं कारण आणि आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी चौकशी, फिंगरप्रिंट्स, डिजिटल पुरावे, आणि साक्षीदारांची विचारपूस केली असली, तरी आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. कुटुंबिय व नातेवाईक गेल्या १४ महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाची दारे ठोठावत आहेत. मात्र, त्यांना काहीच कळू दिले जात नाही व न्यायही मिळत नाही, असे मुंडे कुटुंबिय सांगत आहेत. तपासातील विलंबामुळे व्यापारी संघटनाही तेंव्हा आक्रमक झाली होती. 16 जानेवारी 2024 रोजी परळी शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळून पोलिसांच्या तपासातील दिरंगाईचा निषेध केला होता. (Mahadev Munde Murder Case)
आ.सुरेश धस यांनी वाचा फोडल्या नंतर प्रकरण चर्चेत
पोलीस आरोपींना वाचवत आहेत . राजकीय दबावामुळे पोलिसांचा तपास ठप्प झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रवी सानप नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने आरोपी शोधले होते. माञ, त्यांना सोडून द्यायला लावले असा आरोप आ.सुरेश धस यांनी करून या संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्याची मागणी यावेळी करून सध्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे याचा तपास न देता चांगल्या अधिकाऱ्याकडे द्यावा असे सांगितले.
या खुनाचा तपास करणारे आत्ता पर्यंत पाच पोलीस निरीक्षक हे बदलण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण भेटून संपूर्ण माहिती देणार असल्याचे धस यांनी सांगितले आहे.
परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तपास केला आहे. डिजिटल पुरावेही तपासले आहेत, आता आरोपी निष्पन्न झाले नाहीत. आम्ही अनेक लोकांची चौकशी केली आहे. गुप्त माहिती मिळवण्यासाठी बक्षीसही जाहीर केले आहे. तपास सुरू आहे, लवकरच आरोपींना अटक केली जाईल. असे परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. के. नाचण यांनी सांगितले.
मृत महादेव मुंडेंच्या पत्नीची आर्त मागणी
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या 14 महिन्यांपासून न्यायासाठी पोलिसांची दारे ठोठावत आहेत. मात्र, तपासाबाबत कोणतीच ठोस माहिती मिळत नसल्याने त्या निराश आहेत. माझ्या पतीचं राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. ते एक साधे व्यापारी होते. एवढी निर्घृण हत्या करून आरोपी मोकाट आहेत, हे पाहून माझ्या मुलांना वडिलांशिवाय जगण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. या प्रकरणात सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे चौकशी व्हावी, अशी मागणी करत संतोष देशमुख खाद्य प्रमाणे या प्रकरणाचा तपास करावा. यासाठी सीआयडी आणि एसआयटी यंत्रणा नियुक्त कराव्यात, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली.