मालवण : रेवंडी येथे हरिलाल सिंह या वाळू कामगराचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी ललित देऊलकर याला आज येथील न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान या खून प्रकरणातील अन्य चार संशयित आरोपींना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्या त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
वाळू उपशाच्या वादातून रविवारी तळाशील येथील संशयित पाच जणांनी होडीतून येऊन रेवंडी येथे वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर हल्ला केला होता. यात जखमी झालेल्या हरिलाल सिंह हा वाळू कामगार खाडीपात्रात पडून बेपत्ता झाला होता. दोन दिवसानंतर शेलटी खाडी किनारी त्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मालवण पोलिसात विकास चेंदवणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संशयित आरोपी ललित देऊलकर याला ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आज कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खून प्रकरणातील अन्य चार जणांचा पोलीस शोध घेत होते. यात रात्री तेजस पंढरीनाथ सादये (वय २५), रामचंद्र लक्ष्मण तांडेल (वय २७), भारत जगन्नाथ खवणेकर (वय ३२), बाबाजी गणपत तारी (वय ४५) या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, हेमंत पेडणेकर, सुहास पांचाळ, सुशांत पवार आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उद्या त्यांना येथील न्यायालयात हजर केले ज आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.