Published on
:
24 Jan 2025, 11:48 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:48 pm
प्रयागराज : हल्ली अनेक लोकांना लिओनार्डो दा विंची याची अजरामर कलाकृती असलेली ‘मोनालिसा’ कदाचित माहिती नसेल; पण कुंभमेळ्यातील मोनालिसा सर्वांना माहितीची झाली आहे. सुंदर डोळ्यांची व मोहक हास्य असलेली ही षोडशवर्षीय तरुणी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या, स्फटिकांच्या माळा विकण्याचे काम करीत होती. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर ती रातोरात देश-विदेशातही प्रसिद्ध झाली. ती स्वतःही सोशल मीडियात सक्रिय असते हे विशेष. आता तिच्या प्रसिद्धीमुळे तिच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी, व्हिडीओ व रिल्स बनवण्यासाठी तिच्याभोवती गर्दी होऊ लागल्याने व तिच्या तसेच तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याने अखेर तिने कुंभमेळा सोडून आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशातील महेश्वरला ती रेल्वेने जात असतानाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
मोनालिसा भोसले नावाची ही मुलगी आपले पालक, भाऊ-बहीण व अन्य काही लोकांसह माळा विकण्यासाठी कुंभमेळ्यात आली होती. तिला दोन भाऊ व एक बहीण आहे. अतिशय प्रसिद्धी मिळाल्याने तिच्याभोवती लोकांची गर्दी होऊ लागली होती व तिला माळा विकण्याचे काम करणेही कठीण बनले होते. लोकांच्या गर्दीतून तिला सोडवण्यासाठी तिच्या पालकांना नाकीनऊ येत होते. नुकतेच आठ-नऊ जणांनी सेल्फीसाठी तिच्या कुटुंबाच्या तंबूत घुसण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोध केल्यामुळे या तरुणांनी तिच्या भावाला मारहाणही केली होती. स्वतः मोनालिसानेच ही बाब सांगितली होती. अखेर या सर्व प्रकारांना कंटाळून तिने कुंभमेळा सोडण्याचे ठरवले. तिच्या कुटुंबाने तिला परत पाठवून देण्याचे ठरवले होते. आता ती रेल्वेतून प्रवास करीत असतानाचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ती म्हणते, मी थोड्याच वेळात महेश्वरला पोहोचणार आहे. जर मला मदत मिळाली तर मी पुढच्या शाही स्नानावेळी कुंभमेळ्यात नक्कीच येईन. तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या. माझ्यावर असेच प्रेम करीत राहा आणि माझे व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करीत राहा... बाय!’