Published on
:
24 Jan 2025, 11:36 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:36 pm
न्यूयॉर्क : जीवसृष्टीला आवश्यक असणार्या मूलभूत घटकांमध्ये पाण्याचा समावेश होतो. पृथ्वीशिवाय अन्यत्र कुठे पाण्याचे अस्तित्व आहे का याचा सातत्याने शोध घेतला जात असतो. मात्र ब्रह्मांडात हे पाणी आले कुठून हा प्रश्नही कुतूहल निर्माण करणारा आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे की, अतिशय मोठ्या तार्यांच्या स्फोटातून म्हणजेच ‘सुपरनोव्हा’तून पाण्याचे मूलभूत घटक बाहेर पडले व पाण्याची निर्मिती झाली. अशाच एका निरीक्षणपर अहवालानुसार ‘बिग बँग’च्या कोट्यवधी वर्षांनंतर ब्रह्मांडामध्ये मोठे जलसाठे अस्तित्वात होते.
‘नासा’च्या माहितीनुसार पाणी हा ब्रह्मांडातील सर्वात जुन्या घटकांपैकी एक आहे. पृथ्वीशिवाय मंगळाच्या पृष्ठासह अंतर्गत भागातही पाण्याचे साठे असल्याचं म्हटलं जात असून, बुध ग्रहाच्या बर्फाळ टोकापाशी, धूमकेतूच्या चहूबाजूंना आणि विविध ग्रहांच्या चंद्राच्या अंतर्गत भागात असणार्या महासागरांमध्येही जलसाठे अस्तित्वात असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे, तर सूर्यमालेच्या वायूपासून तयार झालेल्या ढगांमध्येही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या एकत्रीकरणानं पाण्याची निर्मिती होत असल्याचा सिद्धांत अस्तित्वात असतानाच दुसरीकडे संशोधकांच्या दाव्यानुसार महाकाय (200 सूर्यांसमान एक तारा) तार्याच्या स्फोटातून ही स्थिती निर्माण होऊन पाण्याची उत्पत्ती होते. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार सुपरनोवातून उत्सर्जित झालेल्या हायड्रोजन, ऑक्सिजन आणि इतर घटकांमुळे तयार झालेल्या ढगांच्या केंद्रस्थानी जलसाठा अस्तित्वात होता. हे पाणी 30 पट अधिक सघन असावं असाही कयास सध्या लावला जात आहे. संशोधकांनी केलेला हा दावा योग्य ठरला तर, ब्रह्मांडामधील जीवसृष्टीची कैक गुपितं उलगडण्यात यामुळं मोठा हातभार लागू शकतो.