Published on
:
24 Jan 2025, 11:48 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:48 pm
खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खांबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर, टँकर व तीन कार यांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये तीन कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर धडीसह निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जुन्या टोलनाक्याजवळ एका कंटेनरची पुढील दोन्ही चाके निखळल्याने रस्त्यावरच आडवा झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या बोगद्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. हा कंटेनर रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास खांबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर उतारावर कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका कारला धडक दिली. ही कार पुढील टँकरवर आदळली त्याचवेळी कंटेनर ने दुसर्या दोन कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एक कार दुसर्या कारवर आदळून ती त्या कारच्या वर जाऊन आदळली.
या अपघातामुळे खांबाटकी बोगदा ते जुन्या टोलनाक्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.