मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने केली होती. जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील ठराव पारीत केला होता. मात्र मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवलेला नाही, अशी स्पष्ट कबुली देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महायुती सरकारची बनवाबनवी उघड केली आहे.
मुंबईतील पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन इंग्रजी नावे बदलण्याची मागणी सातत्याने मुंबईकरांकडून होत आहे. शिवसेनेने सातत्याने हा मुद्दा लावून धरला आहे. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत 2016 पासून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी रेल्वे संशोधन विधेयकावरील चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अरविंद सावंत पत्र पाठवून उत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा ठराव केला होता. मरीन लाईन्स (मुंबादेवी), चर्नी रोड (गिरगाव), करी रोड (लालबाग), सँडहर्स्ट रोड (डोंगरी), का@टन ग्रीन (काळाचौकी), डॉकयार्ड रोड (माझगाव), किंग्ज सर्पल (तीर्थंकर पार्श्वनाथ) अशी रेल्वे स्थानकांची नावे करण्यात येणार आहेत. मात्र यासंदर्भात सरकारने कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱयांनी खोटा प्रचार करून मते मागितल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला.