ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.File Photo
Published on
:
24 Jan 2025, 7:25 pm
Updated on
:
24 Jan 2025, 7:25 pm
पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ एका महिलेचा ट्रक खाली चिरडून जागीच मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला. मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. क्रांती धनंजय पाटील (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकुल धनंजय पाटील ( रा. गजानन निवास, आकाश पेट्रोल पंप पाठीमागे, दिंडोरी रोड) हा त्याच्या आई बरोबर मेरी - रासबिहारी लिंक रोड मार्गे बळी मंदिरकडे आपल्या दुचाकीहून जात होता. एका वाहनास ओव्हरटेक करत असताना आई क्रांती पाटील यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकून त्या रस्त्यावर मध्यभागी पडल्या. यावेळी भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या क्रांती पाटील हिला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुकुल हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या कडेला पडल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.