नागपूर विभागातील कामांसदर्भात ना. चंद्रशेखर बावनकुळे व ना. शिवेंद्रराजेंनी सूचना केल्या.Pudhari Photo
Published on
:
25 Jan 2025, 12:00 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:00 am
सातारा : राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारची विकासकामे केली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयातून नागपूर विभागातील विकासकामांना गती देण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर प्रादेशिक विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बानकुळे आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी अर्थसंकल्पात समाविष्ट होऊ शकणार्या नव्या योजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार करण्यासाठी विभागीय समन्वय व नियोजन यावर भर देण्यात आला. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी विभागाच्या कामकाजातील काटेकोर नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्याच्या प्रगतीचा कणा आहे. नागपूर विभागातील प्रकल्पांना वेग देण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन आणि दर्जाची हमी हे आपल्या प्राथमिकतेचे मुद्दे असायला हवेत, असेही ते म्हणाले.
ना. चंद्रशेखर बानकुळे यांनी महसूल विभागाच्यावतीने विकासकामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विकासकामांमध्ये गती आणण्यासाठी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील समन्वय हेच यशाचे गमक आहे. विभागीय समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. बैठकीत नागपूर प्रादेशिक विभागातील सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पांना भेडसावणार्या अडचणी आणि पुढील टप्प्यातील योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. विकास कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेचा मिलाफ साधण्याचा निर्धार या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे नागपूर प्रादेशिक विभागातील प्रकल्पांना नवी दिशा मिळेल आणि शासकीय विभागांमधील समन्वयाद्वारे राज्याच्या विकासाला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.