स्थळ – शिवसेना भवन, दादर
वेळ- सायंकाळी 6 वाजता
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रीय मतदार दिनी शिवसेनेच्या वतीने राज्यभरात संविधान आणि भारतमातेचे पूजन केले जाणार आहे. मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संविधान आणि भारतमातेचे पूजन केले जाणार असून राज्याच्या प्रत्येक तालुक्यात संविधान आणि भारतमातेची वाजतगाजत मिरवणूक काढून देशाप्रती आदरभावना व्यक्त केली जाणार आहे.
मुंबईत शिवसेना भवन येथे आज सायंकाळी 6 वाजता संविधान पूजन केले जाणार आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळय़ापासून शिवसेना भवनापर्यंत पालखीमधून संविधान आणि भारतमातेची बॅण्डच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांबरोबर वारकरीही सहभागी होणार आहेत. त्यानंतर शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संविधानाचे आणि भारतमातेचे पूजन केले जाईल. यावेळी घंटानादही केला जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल.
प्रत्येक तालुक्यात मिरवणूक
ग्रामीण महाराष्ट्रात तालुका स्तरावर सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संविधान आणि भारतमातेची मिरवणूक काढून तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱया व्यासपीठावर संविधान पूजन केले जाईल.