औषधे घेताना...
Published on
:
25 Jan 2025, 12:17 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:17 am
आपल्याला लवकर बरे व्हायचे असेल तर योग्य पद्धतीने औषधे घेतली तरच त्याचा योग्य परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीने औषधे घेतल्यास उपयोगापेक्षा त्रासच होण्याची शक्यता असते. अनेकदा काही व्यक्ती पाणी न पिता नुसतेच गोळ्या, औषधे गिळतात किंवा अगदी एकच घोट पाणी पितात. आपल्यापैकी कोणालाही अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा.
अन्ननलिकेला त्रास : बिन पाण्याचे औषध घेतल्यास अन्ननलिकेला नुकसान होऊ शकते.
छातीत वेदना आणि जळजळ : गोळी मोठ्या आकारातील असेल आणि ती पाण्याशिवाय घेण्याचा प्रयत्न केल्यास अन्ननलिकेत तसेच छातीत वेदना आणि जळजळ होऊ शकते.
श्वास घेण्यास अडचण : अन्ननलिका खूप नाजूक पेशींनी तयार होते. गोळी अन्ननलिकेत अडकली तर घशाला त्रास होतोच शिवाय ते प्राणघातकही ठरू शकते. पाण्याविना गोळ्या गिळल्यास अन्ननलिकेत अल्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते. एका अभ्यासानुसार कोणत्याही प्रकारच्या औषधामुळे अन्ननलिकेत अल्सर होऊ शकतो.
पाण्याबरोबर गोळी खाल्ल्यास ती लवकर विरघळते असा एक समज आहे; मात्र त्यात फारसे तथ्य नाही. औषध योग्य जागी पोहोचवणे हे पाण्याबरोबर गोळी खाण्याचे खरे कारण आहे. औषधे घेताना कोणत्या स्थितीत आहात याकडेही लक्ष द्यायला हवे. गोळी घेताना ती शांतपणाने बसूनच घ्यावी. जेवणापूर्वी किंवा जेवण झाल्यानंतर किमान 15 मिनिटांनंतरच गोळ्या-औषधे घ्यावीत. गोळी घेतल्यानंतर किमान 15 मिनिटे झोपू नये. कोणतीही औषधे घेताना वैद्यकीय सल्ला आणि औषधांची एक्स्पायरी डेट या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे कधीही विसरू नये.