Published on
:
24 Jan 2025, 5:42 pm
Updated on
:
24 Jan 2025, 5:42 pm
नवी दिल्ली : निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असेल तर या क्षणाला राजीनामा द्यायला तयार आहे तसेच माझ्या मतदारसंघातील १ लाख ७५ हजार नागरिकांचे प्रतिज्ञापत्र पुढील दोन दिवसात निवडणूक आयोगाला देणार आहे, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केले. तसेच २५ जानेवारीला प्रस्तावित असलेले सत्याग्रह आंदोलन स्थगित केले आहे. १ फेब्रुवारी नंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून यावर निर्णय घेणार आहोत, असेही उत्तमराव जानकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला त्यांच्यासह माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, वकील मेहमूद पाचा उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जानकर म्हणाले की, ‘मी यापूर्वी ईव्हीएम विरोधात नव्हतो मात्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील मारकडवाडीसह धानोरी गावात उठाव झाला. मतदारसंघात फिरत असताना अनेक लोकांनी मला मतदान केल्याचे सांगितले. तशी १ लाख ७५ हजार प्रतिज्ञापत्र माझ्याकडे जमा झाली. यातला १ भाग यापूर्वी निवडणूक आयोगाला दिला आहे आणि उर्वरित सर्व प्रतिज्ञापत्र पुढच्या दोन दिवसात देणार आहोत. मला १ लाख ७५ हजार मते निवडणुकीत मिळाली. मात्र ती ईव्हीएममध्ये बदलली गेली,’ असा दावाही उत्तमराव जानकर यांनी यावेळी केला.
२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी उत्तमराव जानकर दिल्लीतील जंतर-मंतरवर सत्याग्रह आंदोलन करणार होते. या आंदोलनाच्या माध्यमातून ईव्हीएमचा विरोध आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही ते करणार होते. मात्र प्रशासनाने जंतर-मंतरवर सत्याग्रह आंदोलन करण्यास परवानगी दिली नाही. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी दिली नाही, त्यामुळे हे आंदोलन स्थगित केले आहे. १ फेब्रुवारी नंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून आंदोलन करणार आहे, असेही उत्तमराव जानकर म्हणाले.
दरम्यान, उत्तमराव जानकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्हाला काल भेट नाकारली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य लोकांची मते चोरली गेली आहेत. हिच शक्यता दिल्ली, बिहार किंवा इतर राज्यांच्याही निवडणुकीमध्ये होऊ शकते. जर तसे केले नाही तर दिल्ली विधानसभेत भाजपचा पराभव होईल, असेही जानकर म्हणाले. निवडणूक आयोगाला मी आव्हान दिले आहे, जर ते बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असतील तर मी माझा राजीनामा या क्षणाला द्यायला तयार आहे. १५ दिवसांचा वेळ त्यांना यासंबंधी दिलेला आहे. त्यांचा काय प्रतिसाद देतो त्यावर पुढे निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.